नागपूर : नागपूरजवळील बाजारगावच्या सोलार एक्सप्लोझिव्ह आणि धामनातील चामुंडी कंपनीत दीड वर्षांत दोन वेगवेगळ्या स्फोटात १७ हून अधिक बळी गेले. शिवाय नक्षलग्रस्त भाग, खाण परिसरातील स्फोटातही बरेच बळी जातात. परंतु, अशा घटनेत जळालेल्यांवर अद्ययावत उपचारासाठी विदर्भात एकही ‘बर्न वाॅशिंग युनिट’ नाही. त्यामुळे येथील जाळीत रुग्णांचे हाल होत आहेत.

विदर्भात शस्त्रांची निर्मिती करणाऱ्या काही आयुध निर्माणी विदर्भात आहेत. येथे लष्करी वापरासाठी बॉम्ब, अग्निबाण, बॉम्बचे कवच आणि अन्य शस्त्रे तयार होतात. याखेरीज चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली भागात मायनिंगचे प्रकल्प आहेत. खापा, उमरेड व इतर भागातही अनेक खाणी आहेत. अनेकदा खाणींमध्ये स्फोट होतात. या घटनेतील जखमींच्या जखमा धुण्यासाठी स्वतंत्र ‘बर्न वॉशिंग युनिट’ची गरज असते. परंतु मेडिकल, मेयोसह विदर्भातील एकाही वैद्यकीय महाविद्यालयात ‘बर्न वॉशिंग युनिट’ नाही. मध्यंतरी केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, राज्य सरकारने सकारात्मकता न दाखवल्याने केंद्रानेही हात झटकले. ‘बर्न वाॅशिंग युनिट’ अभावी गंभीर जळीत रुग्णांच्या उपचारात हयगय होत असून विविध संक्रमणामुळे काहींना जीवही गमवाला लागत आहे.

हेही वाचा – नागपूर: आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषीमाल बाजारात कष्टकऱ्यांची वास्तू ! काय आहे इतिहास ?

जळीत रुग्णाच्या उपचारात हयगय

विदर्भातील आयुध निर्माणी आणि खाणीत अनेकदा स्फोटाच्या घटना घडतात. त्यात जळालेल्या रुग्णांच्या जखमा धुण्यासाठी स्वतंत्र ‘बर्न वॉशिंग युनिट’ची गरज असते. परंतु मेडिकल, मेयोसह विदर्भातील एकाही वैद्यकीय महाविद्यालयात ‘बर्न वॉशिंग युनिट’ नाही. यामुळे गंभीर जळीत रुग्णांच्या उपचारात हयगय होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रस्ताव धूळखात

नागपुरातील मेडिकल रुग्णालयाकडून ‘बर्न युनिट’साठी सुमारे २३ कोटींचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्यामार्फत केंद्राला पाठवण्यात आला होता. परंतु, केंद्राने केवळ ६ कोटी रुपये देऊ केल्यावर हा प्रस्ताव बदलून लहान प्रकल्प करण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर कधी १८ कोटी तर कधी आणखी कमी किमतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला. मेयो रुग्णालयाकडूनही वैद्यकीय शिक्षण खात्याला प्रस्ताव पाठवला गेला. परंतु, हे सर्व प्रस्ताव सध्या वैद्यकीय शिक्षण खात्यात धूळखात आहे.

हेही वाचा – लष्कर छावणीतील जवान ऑटोरिक्षाने कन्हान नदी पुलावरून जात होते, समोरून ट्रॅव्हल्स आली अन्…

विदर्भात स्फोटात मृत्यूच्या मोठ्या घटना कोणत्या?

सहा ते सात वर्षांपूर्वी पुलगावातील शस्त्रभांडाराला भीषण आग लागून अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीररित्या भाजले गेले होते. मागील वर्षी नागपूरजवळील बाजारगावच्या सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीमध्ये स्फोट होऊन ९ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर आता तीन दिवसांपूर्वी धामनातील चामुंडी कंपनीतील स्फोट होऊन एकूण नऊ कामगारांचा बळी गेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भातील सगळ्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमद्ये जळालेल्या रुग्णांवर उपचाराच्या सोयी आहेत. त्यात आणखी सुविधा किंवा नवीन युनिट वाढवण्याचे प्रस्ताव असल्यास तातडीने त्यावर कारवाई केली जाईल. – डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.