गोंदिया : राज्यातील महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहेत. परतीच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना भरघोष मदत करण्याची गरज आहे. मात्र महायुतीची सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला.
आ. नाना पटोले हे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या द्वारे आयोजित दिवाळी मिलन सोहळ्याकरिता गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी भाजप नेते आ. परिणय फुके, मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सरकारातील सर्व पक्षांच्या नेत्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, मंत्री बावणकुळे यांना शिंग फुटले असतील तर मला माहिती नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसवर बंदी घालण्याचे विचार मांडले होते. तेव्हा ते देशाचे गृह मंत्री होते. मग काय सरदार वल्लभभाई पटेल यांना देशद्रोही ठरविणार आहात काय? असा उलट सवाल केला. महायुतीचे नेते म्हणजे, उचलली जीभ लावली टाळ्या ला करणारे. मात्र हे आता चालणार नाही. कायदा सर्वांसाठी आहे, कायद्याप्रमाणे सर्व संघटनांनी वागावे.
ते म्हणाले, निवडणूका आल्या की, महायुतीचे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने आम्ही. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांच्या पाठिशी असल्याचे सांगत आहेत. निवडणूक जाहिरनाम्यात कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले होते. मग कर्जमाफी का नाही? सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे. अदानीला जेव्हा पैसा दिला जातो, तो पैसा येतो कुठून? हे देखील या सरकारने सांगितले पाहिजे. शेतकऱ्यांची थट्टा करून कर्जमाफी द्यायची नसेल तर हे सुध्दा चालणार नाही. शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात साजरी केली. विदर्भासह राज्यातील शेतकरी अवकाळी व परतीच्या पावसाने अडचणीत आला आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे.
डॉ. परिणय फुके यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, भंडारा नगर परिषदेवर त्यांच्याच पक्षाचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर प्रशासक राज आहे. मग २० टक्के कमिशनचा आरोप कुणावर हे त्यांनी सांगितले पाहिजे. कोण कमिशन खातो, कुणाला वाटा भेटतो. आम्ही सुद्धा याची जंत्री काढून ठेवली आहे. भ्रष्टाचारामध्ये गुरफटले महायुती सरकार आहे. जनतेची लुट करायची आणि मलई खायचे, हेच त्यांची कामे आहेत. असा आरोप देखील नाना पटोले यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड, अशोक गुप्ता , प्रदेश सरचिटणीस अमर वराडे, बाबा बागडे, वंदना काळे यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते.
नगर परिषद निवडणुकीत स्थानिक परिस्थितीला घेवून युती आघाडीचा निर्णय घेऊ.असे ते म्हणाले. या निवडणुकीत काँग्रेस सर्व शक्तीनिशी उतरणार आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या विश्वासात घेवून तसेच परिस्थितीला समरस होवून महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना घेवून निवडणुक लढविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे आ. नाना पटोले यांनी सुचक वक्तव्य केले.
