यवतमाळ : विदर्भ- मराठवाडा सीमेवरील पैनगंगा प्रकल्पाविरोधात धरण विरोधी संघर्ष समितीने हरित लवाद, पुणे येथे दाखल केलेल्या याचिकेचा निकाल पाटबंधारे विभाग व शासनाच्या बाजूने लागला.त्यानंतर पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपूर्वी खंबाळा येथे दीडशे पोलिसांच्या बंदोबस्तात, केवळ काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निम्न पैनगंगा प्रकल्पाचे भूमिपूजन केले. यानंतर धरण विरोधी संघर्ष समितीने घेतलेल्या बैठकीत निम्न पैनगंगा धरण विरोधी लढा पुन्हा जोमाने सुरू करण्याचा निर्धार केला.

पाटबंधारे विभागाने या भूमिपूजनाचे फोटो समाज माध्यमांवर टाकून, धरण विरोधी संघर्ष समितीचा विरोध डावलून, ‘२८ वर्षांनंतर प्रकल्पाची सुरुवात केली’, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गेल्या २८ वर्षांपासून या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने शासनाविरुद्ध सातत्याने लढा दिला असून, आजवर या प्रकल्पाचे उद्घाटनही होऊ दिले नव्हते.हरित लवाद पुणे न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर बुडीत क्षेत्रात खळबळ उडाली. परंतु, धरण विरोधी संघर्ष समितीने पुन्हा संघर्षाची तयारी चालवली आहे.

आर्णी तालुक्यातील वरुड (तुका) येथील ग्रामपंचायत भवनात मंगळवारी समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. सुमारे शंभर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुढील रणनीती ठरवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात याचिकेसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक गावात जाऊन लोकांचे मत जाणून घेणे, विरोध कायम ठेवायचा का, यावर ग्रामसभा स्तरावर निर्णय घेणे, या मुद्द्यावर चर्चा झाली.

बुडीत क्षेत्रातील लोकांचा पाठिंबा मिळाल्यास हा लढा नव्या जोमाने, एकजुटीने सुरू केला जाईल. प्रकल्पाचे काम सुरू झाले असले तरी हजारो कार्यकर्त्यांसह खंबाळा येथे धडक देऊन ते थांबवण्याची तयारी समितीने दर्शवली. पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यातील सर्व बुडीत गावांमध्ये बैठका घेऊन अंतिम दिशा ठरवली जाणार आहे. हरित लवाद, पुणे न्यायालयाचा निकाल प्रतिकूल लागला असला तरी औरंगाबाद नागपूर खंडपीठातील खटल्यांचे निकाल अद्याप बाकी आहेत. त्यामुळे समिती खचून जाणार नाही, असा ठाम निर्धार पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

बैठकीस धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप, मार्गदर्शक रामकृष्ण पाटील राऊत, मुबारक तंवर, प्रल्हाद गावंडे, अ‍ॅड. बालाजी येरावार, विजय पाटील राऊत, प्रदीप गावंडे, जयराम मिश्रा, उत्तमराव भेंडे, गजानन डाखोरे, उत्तमराव मिरासे, विजय पाझारे, बंटी पाटील जोमदे, कैलास उकले, सुरेश महले, त्र्यंबक पाटील, भाऊ तितरे, सुनील गावंडे, सतिष नागोसे, घनश्याम मेश्राम, रवींद्र भोंगाडे, मंगेश देशमुख, संजय राकेश, गुलाब मेश्राम, दिलीप ठाकरे यांच्यासह विदर्भ–मराठवाड्यातील अनेक सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.