नागपूर: तत्कालीन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्यातील घरगुतीसह सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटल लावणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्विकारल्यावर मात्र जबरन ग्राहकांकडे स्मार्ट मीटरचे नाव टीओडी मीटर करून सक्तीने लावले जात आहे. हे मीटर लावल्यास उग्र आंदोलनाचा इशारा देत संतप्त विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी व्हेरायटी चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी मीटरचे पोस्टर जाळण्यात आले.

आंदोलकांनी सांगितले की, अदानी, मोंटोकार्लोसह इतरही खासगी उद्योजकांचे खिसे भरण्यासाठी सरकार जबरन ग्राहकांकडे हे महागडे मीटर बसवत आहे. हे मीटर खूप जास्त दराने खासगी कंपनीकडून लावण्याचे करार केले गेले असून त्याच्या बदल्यास सत्ताधाऱ्यांना विविध पद्धतीने लाभ मिळण्याची शक्यताही आंदोलकांनी वर्तवली. दरम्यान नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत महावितरणच्या वीज ग्राहकांना पूर्व सुचना न देता जबरजस्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जात आहे. या मीटरला ग्राहकांसोबतच विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विरोध आहे.

दरम्यान हे मीटर लावण्यासाठी त्याचे नाव बदलून टीओडी (टाईम ऑफ द डे) मीटर असे केले गेले आहे. विधानसभेत स्मार्ट प्रीपेड मीटल लावणार नसल्याची घोषणा असल्याने या मीटरचे वेगळे नामकरण केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. नागपूर जिल्ह्यात १४ लाखाहून जास्त ग्राहकांचे आधीच चांगले असलेले मीटर बदलवून त्या जागी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याकरिता मोंटेकार्लो व जीनस कंपनीचे स्मार्ट मीटर अगोदरच डंप करून ठेवण्यात आले आहे. हे मीटर जबरन ग्राहकांकडे लावले जात आहे.

या मीटरच्या उपक्रमात उद्योगपतींची मोठी गुंतवणूक असून त्यांना आपला पैसा वसूल करून घ्यायचा आहे. त्याकरिता महावितरण कंपनीवर नियंत्रण ठेवत व आंदोलकांच्या आणि वीज ग्राहकांचे लक्ष या बाजूने लागू नये याकरिता वीज ग्राहकांना पूर्वसुचना न देता व “विदाऊट कॅलीब्रेशन सर्टीफीकेशन” व ”ओके टेस्टींग रीपोर्ट” नसलेले स्मार्ट प्रीपेड मीटर हळुहळू बसविल्या जात असल्याचाही आंदोलकांचा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मार्ट मीटर रद्द करण्याचे नारे… आंदोलकांनी सकाळी व्हेरायटी चौक परिसरात गोळा होऊन ‘स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करा, रद्द करा’, ‘वीज दरवाढ मागे घ्या’, ‘दिल्लीत आहे वीज स्वस्त, विदर्भातील जनता वीज दरवाढीने त्रस्त’, ‘ऊर्जामंत्री मुर्दाबाद’ असे नारे लावले. दरम्यान आंदोलकांनी ग्राहकांकडे जोरजबरजस्तीने जर प्रीपेड मीटर बसवले गेल्यास आम्ही डंप केलेले प्रीपेड मीटर नष्ट करू. प्रसंगी जेलमध्येही जाऊ असाही इशारा आंदोलकांकडून केला गेला. आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समिती, समितीची युवा आघाडीसह इतरही काही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.