नागपूर : राज्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला असून विदर्भ होरपळून निघत आहे. येथील तापमान आता ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊन पोहचले असून राज्यातच नाही तर देशात विदर्भातील शहरे सर्वाधिक तापमानाच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. एवढेच नाही तर जगभरातील सर्वाधिक तापणाऱ्या शहराच्या यादीत विदर्भातील शहरे पहिल्या दहामध्ये आहेत. हवामान खात्याने आठ राज्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भासह मराठवाड्यात आणि राज्याच्या बहुतांश भागात उन्हाने जीवाची काहिली होत आहे. गेल्या तीन दिवसांत तापमानाच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअसवरून ४५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. त्यातच आता रविवारपासून तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा “येलो अलर्ट” जारी केला आहे. सूर्यनारायण कोपल्यामुळे लोकांना घरातून बाहेर पाय काढणे मुश्किल झाले आहे.
इशारा कुठे कुठे ?
हवामान विभागाने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूर या शहरांना उष्णतेचा “येलो अलर्ट” जारी केला आहे. मुंबई आणि उपनगरांत रविवारी सामान्य तापमान गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अधिक नोंदवले गेले. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीरसह २० राज्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भाची स्थिती काय ?
विदर्भात उष्णतेचा प्रकोप सुरूच असून विदर्भात चंद्रपूरमध्ये रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूर मध्ये ४४.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर शनिवारी नागपूर येथे ४४.७ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. रविवारी विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पारा ४४ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. शनिवारी नागपूर तर रविवारी चंद्रपूर देशात भारतातील सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली.
हवामान प्रणालीवर कशाचा परिणाम ?
सध्या हवामानावर परिणाम करणाऱ्या प्रमुख प्रणालींमध्ये पाकिस्तानमधील सायकोलॉनिक सर्कुलेशन, राजस्थानच्या सीमेवर निम्न दाबाचा पट्टा, बांग्लादेशपर्यंत पसरलेली पूर्व-पश्चिम दिशेची कमी दाबाची रेखा, उत्तर मध्य प्रदेश ते गल्फ ऑफ मन्नारपर्यंत एक ट्रफलाइन, आणि आसाम-त्रिपुरा दरम्यान ३.१ किमी उंचीवर असलेला उत्तर-दक्षिण ट्रफ यांचा समावेश आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.