यवतमाळ : शहरात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस होता. बांगर नगर परिसरातील पेट्रोल पंपासमोर एका नाल्यात सकाळी साडेअकराच्या सुमारास एक महिला वाहून गेली. ही महिला नाल्यात पडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बचाव पथकाने तब्बल आठ तास शोधकार्य केल्यानंतर सायंकाळी या महिलेचा मृतदेहच हाती लागला. बेबी दौलत घोडमारे (६०, शास्त्री नगर, गोदाम फैल, यवतमाळ) असे या महिलेचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर शहरात अनेक सखल भागांत पाणी भरले. बांगर नगरमधील पेट्रोल पंपाजवळ एक नाला वाहतो. या ठिकाणी ड्रेनेजचे मोठे पाईप टाकण्यात आले आहे. ही महिला पेट्रोल पंपाकडून छत्री घेऊन पायदळ जात असताना अचानक एका खड्ड्यात पडली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी तिच्या बचावासाठी धावत आले. मात्र पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने ती महिला त्या खड्ड्यात दिसेनाशी झाली. ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली, बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली.

हेही वाचा – उपराजधानीत चोवीस तासांत चार हत्यांकाड, दोन व्यापाऱ्यांचा गोळ्या घालून खून

प्रशासनाने घटनास्थळी सर्वत्र शोध कार्य सुरू केले. अखेर जेसीबीद्वारे संपूर्ण नाली खोदून काढण्यात आली, तेव्हा सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका पाईपमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेने शहरात नगरपरिषद प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे यवतमाळ शहर खड्डेमय झाले असून यावर्षी पावसाळ्यापूर्वी शहरात नाल्यांच्या स्वच्छतेची कामे झालेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा – “हिंदू समाज स्वार्थापोटी सख्ख्या भावालाही दगा…”, शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागोजागी कचरा तुंबला असून थोडासाही पाऊस झाला की नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन ते घरात शिरत आहे. यवतमाळच्या इतिहासात पहिल्यांदाच आठवडाभरात शहर जलमय झाले. पालकमंत्री, जिल्हाधिकारी कोणीही यवतमाळतील पूर परिस्थिती गांभीर्याने घेतली नसल्याचा आरोप आता नागरिक करीत आहेत.