गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभार्थी क्षेत्रातील शेतकरी पीक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर बुधवारी रवाना झाले आहे.
सिंचन खात्याच्या मार्फत आयोजित दौऱ्यात सुमारे २०० शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांना २८ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे इस्लामपूर येथे संबोधित करतील.

पंढपूर, बारामती, इस्लामपूर, बेलांकी आणि सांगोळा भागाला भेटी देऊन तेथील शेती करण्याची पद्धत, बागायती शेती आणि सिंचन पाण्याच्या वापर यासंदर्भात या दौऱ्यात अभ्यास केला जाणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून या धरणाचे पाणी मूबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पद्धतीत बदल करण्याची मानसिकता शेतकऱ्यांची तयार व्हावी. त्यांनी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे फळ बागा लावाव्यात आणि आर्थिक प्रगती करावी. हा हेतू या अभ्यास दौऱ्या मागे आहे.

सिंचन खात्याने पुढाकार घेऊन हा अभ्यास दौरा हाती घेतला आहे. या दौऱ्यात नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील निवडक २०० प्रगतीशील शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना ऊस लागवड, आमराई फळ बाग, कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र, ऊस कारखाना व काही शेतांना भेट देवून पाहणी करण्यात येणार आहे. २५ ते २९ मे या कालावधीत होत अशलेल्या दौऱ्याला शेतकरी समृद्धी अभ्यास दौरा असे नाव देण्यात आले आहे.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते यांनी हिरवी झेंडी दाखवून अभ्यास दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता जगत टाले, कार्यकारी अभियंता किशोर दमाह, सुहास मोरे उपस्थित होते.