नागपूर : “नागपूरमध्ये पार पडलेला ओबीसी मोर्चा यशस्वी ठरल्यानंतर भाजपने मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. छगन भुजबळ हे महायुती सरकारमधील मंत्री असून, बीडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी माझ्यावर केलेली टीका त्याचाच एक भाग आहे,” अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. वडेट्टीवार म्हणाले, “छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही कधीच भाष्य केलं नाही. मात्र आधी मनोज जरांगे पाटील आणि आता भुजबळ साहेब, दोघांनीही मला टार्गेट केलं आहे. जर माझ्यावर टीका करून समाजाचे प्रश्न सुटत असतील, तर मला त्याचा आनंद आहे. आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जर खरंच २ सप्टेंबरचा ओबीसीविरोधी शासन निर्णय रद्द होणार असेल, तर मी छगन भुजबळ यांच्या पाया पडायला तयार आहे. त्यानंतर मी त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींसाठी पुढे काम करायला तयार आहे.
वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की, हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या व्यक्तींची नोंद आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यास आपल्याला विरोध नाही. “मी एवढंच म्हटलं होतं की जर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार असेल, तर ओबीसींचं आरक्षण वाढवलं पाहिजे. अन्यथा दोन्ही समाज उपेक्षित राहतील. मात्र आता या विधानाचा विपर्यास करून मला टार्गेट केलं जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, “२ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झालं आहे. या निर्णयात ‘पात्र’ हा शब्द हटवण्यात आला आणि त्यामुळेच आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. जरांगे पाटील यांच्यावर टीका केली जात आहे, पण जीआर तुमच्या सरकारने काढला आहे. महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे आणि अतुल सावे हे मंत्री आहेत. त्यांनी हा शासन निर्णय रद्द करून दाखवावा.”
वडेट्टीवार यांनी यावेळी सरकारवर आणखी गंभीर आरोप करत म्हटलं की, “महायुती सरकार समाजात फूट पाडत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी असे संघर्ष निर्माण करून सरकार जनतेचे लक्ष मूलभूत प्रश्नांवरून हटवत आहे. शेतकरी अडचणीत आहेत, पिकांना भाव नाही, बेरोजगारी वाढली आहे, कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे, पण सरकार समाजात तेढ निर्माण करत आहे.” “हा शासन निर्णय ओबीसी समाजाच्या शिक्षण व नोकरीवर थेट परिणाम करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय समाजाच्या मूळावर घाव घालणारा ठरतो. तो निर्णय घेऊन विखे पाटील गेले होते, आता मंत्रिमंडळातील संबंधित मंत्र्यांनीच तो निर्णय रद्द करून दाखवावा,” अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.