चंद्रपूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. संजय देशमुख यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदार आणि सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. अशातच या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराडबाबत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. वाल्मीक कराड महायुती सरकारच्या ‘लाडके आरोपी योजने’त येत असल्याने बीड पोलीस स्टेशनमध्ये पाच नवीन बेड आले का? असा प्रश्न उपस्थित करीत आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

इतके योगायोग चित्रपटातही नसतात

वाल्मीक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग तर चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण… असं सगळच मिळेल! वाल्मीक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे की नाही? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या दहशतीत ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने वाल्मीक कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. वाल्मीक कराडवर अद्यापही संतोष देशमुख हत्या आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे! पोलिसांनी याप्रकरणी योग्य पद्धतीने तपास करावा, आरोपीचे लाड पुरवू नये, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा… चंद्रपूर : जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीचे वेध

पोलीस, गृहखात्याचे अपयशच

विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणी राज्याच्या गृहखात्यावरदेखील टीका केली आहे. पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केलं? खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलीस, सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर सरेंडर होताना वाल्मीक कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असूच शकत नाही! इतके दिवस वाल्मीक कराडला लपायला कोणी मदत केली? तो कोणाच्या संपर्कात होता? कोणाच्या सांगण्यावरून त्याने सरेंडर केले, यामागील सत्य समोर आले पाहिजे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

हे ही वाचा… नागपूर महापालिकेकडून कर वसुलीसाठी दंड माफी, काय आहे योजना?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाल्मीक कराडमागे मोठी शक्ती

महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तिंनी त्याला सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का? या वाल्मीक कराडची हिंमत इतकी की तो सरेंडर होण्याआधी व्हिडीओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो. यातून त्याच्यामागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट होते. याप्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलीस, सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही, असे दिसते. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत करावी आणि ही चौकशी बीड जिल्ह्याच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही, अशी सूचनाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.