नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प पर्यटकांना कधी निराश करत नाही. त्यातही मोहर्लीचा परिसर म्हणजे या व्याघ्रप्रकल्पातील अतिशय जूना आणि याठिकाणी वाघ नाही दिसला तर नवलच! असेच म्हटले जाते. मोहर्ली मार्गावरचा अलीकडचाच साधारण दीड ते दोन महिन्यापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

यात वाघिणीच्या बछड्यांनी चक्क दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी गजेंद्र बावणे यांनी हा प्रसंग चित्रित केला आहे.
जंगलात पर्यटन करताना पर्यटकांनी वाघांचा रस्ता अडवून धरल्याचे अनेक व्हिडिओ समोर येतात. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील प्रकरण अगदी ताजे म्हणजेच आठ महिन्यांपूर्वीचे आहे.

या अभयारण्यात ‘एफ-२’ नावाची वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांना पाहण्यासाठी पर्यटकांचा अक्षरश: ओघ आहे. अशाच एका सफारीदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने पर्यटकांच्या वाहनांनी ही वाघीण आणि तिच्या बछड्यांचा रस्ता रोखून धरल्याचा व्हिडिओ समोर आला. ‘लोकसत्ता’त हे वृत्त आल्यानंतर न्यायालयाने त्याची दखल घेत स्वत:हून याचिका दाखल केली. तर याच प्रकरणात जिप्सीचालक, पर्यटक मार्गदर्शक आणि काही पर्यटकांवर देखील कारवाई करण्यात आली. मात्र, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. ‘डब्ल्यू मार्क’ या नावाने एक वाघीण याठिकाणी प्रसिद्ध आहे. तिच्या उजव्या डोळ्याजवळ डब्ल्यू आकाराचे चित्र असल्यामुळे तिचे नाव ‘डब्ल्यू मार्क’ असे पडले.

‘डब्ल्यू मार्क’ या वाघिणीला तीन बछडे आहेत आणि ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्ली झोनमध्ये पुढील सफारी हंगामात ते ‘शोस्टॉपर’ ठरतील, असा पर्यटकांचा अंदाज आहे. या वाघिणीचे ‘वाय मार्क’ आणि ‘शंभू’ या दोन्ही वाघांसोबत तिचे मिलन झाले होते. या वाघिणीला दोन नर आणि एक मादी बछडा आहे. तिचे दोन्ही नर बछडे अतिशय धाडसी आहेत. या वाघीणीचे बछडे मोहर्ली मार्गावर आले. या मार्गावर बऱ्याचदा वाहनांची वर्दळ दिसून येते आणि याठिकाणी अनपेक्षितपणे व्याघ्रदर्शन देखील झाले आहे. बफरचा काही भाग असल्याने आणि गावे असल्यामुळे गावकऱ्यांची वाहनेही येथून जातात आणि त्यांनाही बरेचदा व्याघ्रदर्शन होते.

जुलै महिन्यात ‘डब्ल्यू मार्क’ वाघिणीचे दोन्ही बछडे जंगलातून रस्त्यावर आले. रस्ता ओलांडून ते निघून जातील, असेच सर्वांना वाटले. मात्र, सुरुवातीला त्यांनी रस्त्यावर फेरफटका मारला. नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या डबक्यातील पाणी ते प्यायले. पुन्हा त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पहिल्यांदाच वाघांनी दोन्ही बाजूची वाहतूक अडवून धरल्याचे चित्र दिसून आले.