नागपूर : श्वेता असोसिएशन ही कोड असणाऱ्या व्यक्तींची आणि त्यांना मदत करणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेचे गेल्या २५ वर्षांपासून कार्य सुरू आहे. भारतातील हा पहिलाच स्वमदत गट आहे जो कोड असणाऱ्या व्यक्तींसाठी, त्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी काही कामे करीत आहे.

कोड असणाऱ्या व्यक्तींचे समुपदेशन, वधुवर मंडळ, नोकरीविषयक सहायता, डाग झाकोळणारी प्रसाधने उपलब्ध करून देणे, या व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला प्रदर्शन आयोजित करणे, कोड असणाऱ्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी फॅशन शो आयोजित करणे, सभासदांनी अभिव्यक्त व्हावे यासाठी ‘रंग मनाचे’ वार्षिक प्रकाशित करणे, कोडविषयक जनजागृती आणि कोडाला असणारा सामाजिक कलंक दूर करण्यासाठी जाहीर सभा आयोजित करणे, पुस्तिका, पत्रके छापणे, ‘रन फॉर व्हिटिलिगो’ मॅराथॉन आयोजित करणे इत्यादी उपक्रम राबवले जातात. चित्रपटांचे जनमानसावर असलेले गारुड लक्षात घेऊन २००६ या वर्षी ‘नितळ’ या पारितोषिक विजेत्या चित्रपटाची निर्मिती केली. कोडावर सर्वात उपयुक्त असणाऱ्या फोटो थेरपी उपचारासाठी महाराष्ट्रात १० सेंटर्स सुरू केली.

वधुवर मंडळ आणि वधुवर मेळावे हा श्वेता असोसिएशनचा सर्वात लोकप्रिय उपक्रम आहे. २००२ साली सुरू झालेल्या या वधुवर मंडळात २८००-२९०० जणांची नोंदणी आहे. ही सेवा अतिशय माफक दरात ऑनलाईन उपलब्ध आहे. ज्यांना स्वतःला पांढरे डाग आहेत किंवा घरात आईवडील किंवा इतर नातेवाईकांना पांढरे डाग आहेत म्हणून लग्नाला अडचणी येत आहेत अशा आणि पांढऱ्या डागांचा बाऊ न करता अशा मुलामुलींशी लग्न करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

नागपुरात पाचवा मेळावा

यावर्षीचा श्वेता असोसिएशनचा ६१ वा वधुवर मेळावा आहे आणि नागपुरातील ५ वा मेळावा आहे. विदर्भ, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पुणे, मुंबई, नाशिक इत्यादी प्रभागातून लोक येतात. विदर्भातील अनेक मुलामुलींची श्वेता वधुवर मेळाव्यातून लग्नं जुळली आहेत. या मेळाव्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे. इच्छुक वधू – वरांनी मेळाव्यासाठी येताना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत, १ फुल साईझ फोटो बरोबर घेऊन यावा, असे संस्थेच्या अध्यक्ष डॉ. माया तुळपुळे यांनी आवाहन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी, सेवा सदन शिक्षण संथेचे, विमलाबाई जटार सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग, मेट्रो स्टेशनजवळ, झांशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत हा वधू – वर मेळावा संपन्न होईल. अधिक माहितीसाठी ८८८८८६५४८७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.