Minister Dr Pankaj Bhoyar / वर्धा : पुरातन इतिहास असलेली अनेक धार्मिक स्थळे गौरवशाली वारसा राखून असतात. पण काळानुरूप त्यावर उदासीनतेची मळभ चढते. हा वारसा जतन करीत उज्वल ठेवायचा असेल तर शासकीय मदतीचा हात आवश्यक ठरतो. अन्यथा पडझड व दुर्लक्षित होणे आलेच. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने काही ऐतिहासिक मंदिरांना तीर्थस्थळाचा दर्जा देत विकास करण्याचा हेतू ठेवला आहे.

उमरी येथील शिव मंदिर आता कात टाकणार असून शहरालगतच्या उमरी (मेघे) येथील प्राचीन शिव मंदिरासह हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथील रूद्धेश्वर व आर्वी तालुक्यातील रसुलाबाद येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराला तीर्थस्थळाचा ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे तिन्ही श्रद्धास्थाच्या विकासाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उमरी मेघे गांव वर्धा शहरालागून असून गावात प्राचीन असे शिव मंदिर आहे. जुन्या जाणकरांच्या मते मंदिराला प्राचीन असा इतिहास लाभला आहे. त्यामुळे महाशिवरात्रीसह अन्य दिवशी भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते.

मंदिर समितीच्या वतीने भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. उमरीचे मंदिराला सुमारे ९०० वर्षांचा इतिहास आहे. नागा साधूंनी शिव मंदिराची स्थापना केल्याचे सांगितले जाते. नागा साधू पैकी एक निरंजन महाराज गावात स्थाईक झाले. त्यांनी या मंदिराच्या उभारणीत सिंहाचा वाटा घेतला. निरंजन महाराज यांना साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी रथाची निर्मिती केली. या रथावर शंकर पार्वती, गणेश, हनुमान, नारद, विश्वमित्र यांच्या प्रतिमा आहे.

महाशिवरात्रीच्या दुस-या दिवशी या रथाची रात्री १२ वाजता मिरवणूक काढण्यात येते. रथयात्रेत शेकडो भाविक सहभागी होत असतात. ही परंपरा निरंजन महाराज यांच्या काळापासून आजतागायत कायम आहे. महाशिवरात्रीच्या दुस-या भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. गावातील नागरिकांसह वर्धा शहर व परिसरातील गावामधील नागरिक महाप्रसादाचा आस्वाद घेतात. तब्बल ५० हजार नागरिक प्रसादाचा लाभ घेतात.

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्या प्रयत्नामुळे मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, पथदीप, भक्तांसाठी सभागृह, प्रसाधनगृह यासह अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या. मंदिरात सतत असणारी भक्तांची रिघ बघता तिर्थस्थळाचा ब दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी देखील पालकमंत्री भोयर यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने उमरी येथील शिव मंदिराला तीर्थस्थळाचा ब वर्ग दर्जा दिला आहे. आज तसे परिपत्रक निघाले आहे.

हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथे वर्धा नदीच्या तिरावर असलेल्या रूद्रेश्वर मंदिराला प्राचीन इतिहास आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरत असते. विदर्भातील प्रमुख शिवमंदिरापैकी एक मंदिर म्हणून मंदिर ओळखल्या जाते. मंदिरात विशाल शिव पिंड असून त्यामध्ये सव्वा खंडी धान्य मावते असे म्हटल्या जाते.मंदिरात ब्रम्ह देवाची देखील मूर्ती आहे.

हेमांडपंथी मंदिर असून या मंदिराचा देखील ब वर्ग तिर्थ क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. रसुलाबाद येथे प्राचीन विठ्ठल रूक्मिणी मंदिर आहे. या मंदिराला देखील प्राचीन असा इतिहास लाभला आहे. राज्य शासनाने तिन्ही मंदिराला तीर्थस्थळांचा ब वर्ग दर्जा दिल्याने या मंदिराच्या विकासाला चालना मिळणार आहे. तथापि,, भाविक भक्तांना देखील अधिक सुविधा मिळणार आहे.

जिल्ह्यात अनेक प्राचीन तिर्थस्थळ आहे. सोबतच बोर प्रकल्पासह अन्य पर्यटन स्थळ आहे. या स्थळांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. काही स्थळांना तिर्थ व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. तर काही स्थळांची दर्जोन्नती करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना चांगल्या सुविधा मिळणार आहे.

या उमरी येथील शिव मंदिर,पोहणा येथील रूद्रेश्वर मंदिर व रसुलाबाद येथील श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिराला तिर्थस्थळांचा ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. लवकरच मंदिराच्या विकासासाठी निधी देण्यात येऊन भक्तांच्या गरजा नुसार सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी नमूद केले.

उमरी येथील मंदिराचा प्राचीन इतिहास लाभला असून अनेकांचे मंदिर श्रद्धास्थान आहे. डॉ. भोयर यांनी उमरी व परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेचा मान ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार, अशी भावना अध्यक्ष श्री शंकर देवस्थान उमरी तथा उपसरपंच सचिन खोसे यांनी व्यक्त केली आहे.