वर्धा : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी अधिक काळीकुट्ट झाल्याचे चित्र पूढे आले आहे. सततच्या अतिवृष्टीने विदर्भातील शेतकरी चांगलाच घायकुतीस आला होता. आंदोलने झाली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची दैना पाहून राज्य सरकारने मदतीचे मोठे पॅकेज जाहीर केले. पण ती मदत सर्व शेतकऱ्यांना पोहचलीच नसल्याची ओरड शांत होत नाही तोच काल शुक्रवारी सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने तोंडचा घास आता पूर्णच हिरावून गेल्याची स्थिती आहे. विदर्भातील सर्वात मोठ्या हिंगणघाट बाजार समितीत पावसाचे लोट वाहले. शेतकऱ्यांचे धान्य त्यात भिजल्याने त्याची किंमत कवडीमोल झाल्याचे म्हटल्या जाते.
वर्धा बाजार समितीत पण शेतकऱ्यांनी आणलेले सोयाबीन पावसात भिजले. रात्री ११ वाजेपर्यंत लिलाव चालले. जो माल विकल्या गेला त्याचे पैसे मिळणार. मात्र जो भिजला त्याची किंमत कवडीची पण राहली नाही. असे असतांना व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवलेला माल मात्र सुरक्षित होता. कारण तो शेडमध्ये ठेवून होता. शेड असे व्यापाऱ्यांच्या मालाने भरून असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर ठेवावा लागला. तो पावसाने खराब झाला, यांस बाजार समितीच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. भिजलेल्या शेतमालाला भावच मिळत नाही. अर्ध्या पेक्षा कमी किंमतीत तो विकावा लागतो. त्यामुळे ५ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल सोयाबीन आता दोन हजारात पण खपणार नसल्याचे शेतकरी म्हणतात.
वर्धा बाजार समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख यांनी हा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की शेतकऱ्यांची आवक बाजार समितीत येण्यापूर्वीची ही बाब आहे. त्यावेळी व्यापारी वर्गाचा शेतमाल ठेवून होता. आता नाही. तसेही दोन, तीन दिवस माल राहतोच. आता शेतकऱ्यांची आवक सूरू झाली आहे. पुरेसे शेड आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात साडे तीन हजार क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आले. त्यामुळे ते उघड्यावर ठेवावे लागले. पण नुकसान फारसे नाही. पण शेड कमी पडतात, हे खरेच. म्हणून नव्याने तीन शेड बांधण्याचा प्रस्ताव पूणे पणन खात्याकडे पाठविण्यात आला आहे. अवकाळी पावसाने फटका बसला, हे खरेच अशी भूमिका पांडुरंग देशमुख यांनी मांडली.
विदर्भभरातून सोयाबीन विक्रिस येणाऱ्या हिंगणघाट बाजार समितीचे अध्यक्ष सुधीर कोठारी हे म्हणतात पाऊस सूरू झाल्याचे समजताच मी बाजार समितीत पोहचलो. तोपर्यंत समिती प्रशासन, व्यापारी व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल झाकून ठेवण्याची तयारी पूर्ण केली होती. पण काही प्रमाणात नुकसान झालेच. ते टाळता येणे शक्य नाही. आमची प्रशस्त व्यवस्था आहे. १ लाख वर्गफुटाचे ७ शेड आहे. पण एकाचवेळी मोठी आवक झाली की आफत होत असते. पण शेतकरी असो की व्यापारी, त्या सर्वांचा शेतमाल सुरक्षित ठेवण्यात आम्ही कमी पडत नाही, अशी खात्री कोठारी देतात.
किसान अधिकार अभियान ही संघटना याबाबत सतर्क झाली आहे. बाजार समितीच्या यार्डात आलेल्या मालाचे नुकसान होत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न संघटना नेते अविनाश काकडे करतात. बहुतेक यार्ड व्यापाऱ्यांच्या मालाने अडवून ठेवल्याने शेतकरी वाऱ्यावर. हिंगणघाट वगळता सेलू, देवळी, सिंदी, वर्धा बाजार समितीत साठवणूक क्षमता नाही. ही जबाबदारी कोणाची ही बाब आम्ही आज पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना विचारणार. संघटना पदाधिकारी समितीस भेट देऊन अहवाल तयार करणार.
