वर्धा : पत्नीची हत्या करीत तिला खड्ड्यात पुरले आणि तो मी नव्हेच असा बनाव करणारा आरोपी पती फरार झाला. मात्र त्याला या कटात मदत करणाऱ्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
हिंगणघाट येथील इंदिरा वॉर्डात ही खळबळजनक घटना घडली आहे. स्थानिक बालाजी दाल मिलमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा सुभाष वैद्य हा आरोपी आहे. त्याचा पूर्वी झालेला विवाह पती पत्नीत वारंवार खटके उडत असल्याने वादात सापडला होता. पत्नी घर सोडून निघून गेली. पुढे रीतसर घटस्फोट झाला. त्यानंतर आरोपी सुभाषने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. वरोरा तालुक्यातील नागरी निवासी किशन कोतरंगे यांची मुलगी माधुरीसोबत सुभाषने दुसरे लग्न केले. माधुरीस पहिल्या लग्नापासून झालेला एक मुलगा होता. त्याची जबाबदारी पण सुभाषने घेतली होती.
लग्नानंतर माधुरी मुलासह हिंगणघाट येथे राहण्यास आली.मात्र काही काळानंतर या दोघात वाद सूरू झाले. ते चांगलेच विकोपास जावू लागले होते. या भांडणाची माहिती माधुरीने माहेरी दिली होती. माहेरची मंडळी तिला घरी परत न्यायला तयार पण झाले होते. परंतू पती सुभाष यांस तयार नव्हता. मात्र मुलास माधुरीने माहेरी पाठवून दिले. तिच्या घरचे नेहमी तिची फोनवरून विचारपूस करायचे. मात्र चार पाच दिवसापासून माधुरीने आईचे फोन उचलनेच बंद केले होते. हे पाहून शंकेची पाल चूकचूकली. आईने शंका व्यक्त केली. शेवटी माधुरीच्या वडिलांनी जावई सुभाषला फोनवर माधुरीबद्दल विचारणा केली. त्याने ती बाहेरगावी गेल्याचे उत्तर देताच आई वडील हिंगणघाटला पोहचले. माधुरी घरी दिसून नं आल्याने मग त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तपास सूरू केला आणि रहस्यमय घटना पुढे आली.
माधुरीचे आईवडील ठाण्यात पोहचले तेव्हा आरोपी सुभाष हा पूर्वीच तिथे दाखल झाला होता. पत्नी हरविल्याची तक्रार देण्यास तो आला होता. पण सासू सासरे पाहून त्याने मग काढता पाय घेतला. आणि फरार झाला. तो फरार झाल्याने संशय त्याच्यावरच केंद्रित झाला. पोलिसांनी त्याच्या घराच्या आजूबाजूला चौकशी केल्यावर या पती पत्नीत वाद असल्याची माहिती पुढे आली.माधुरीचा खून करण्याचा कट आरोपी सुभाषने पूर्वीच आखला होता. चंदाराणा लेआऊट हा नवा परिसर आहे. तिथे फारशी वर्दळ नसते. ते पाहून आरोपी सुभाषने मंगळवारी जेसीबी बोलावून एका रिकाम्या प्लॉटवर खड्डा खोदून घेतला होता. तपासात पोलिसांना त्याच्या घराच्या आसपास माधुरीचे कपडे व अन्य वस्तू आढळून आल्यात. त्या वस्तू जळलेल्या स्थितीत होत्या. अधिक बारकाईने शोध घेणे सूरू केल्यावर परिसरात खोदकाम झाले असल्याचे निष्पन्न झाले. माती बाजूला करून पाहल्यावर गड्डा करीत तो बुजविण्यात आल्याचे दिसले. म्हणून मग जेसीबी बोलावून तो खड्डा उकरण्यात आला. सुरवातीस डांबर गोळया, मीठ आढळले. सहा फूट अधिक खोदल्यावर एक पोते सापडले. त्यातच माधुरीचे शव सापडले.