वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील खुरसापार पंचक्रोशीत स्मशानशांतता पसरली आहे. एक वाघीण, तीचे तीन शावक आणि तिच्या मागावर वाघोबा. गावाच्या वेशीवर हा कबीला दोन महिन्यापासून ठिय्या देऊन बसला आहे. ६ महिन्यापूर्वी चार पैकी एका पिल्लाचा अपघाती मृत्यू झाल्याने वाघीण तेव्हापासून सैरभैर असल्याचे सांगितल्या जाते. तिची याच परिसरात भ्रमंती सूरू आहे. ती व तिच्या मागे तीन बछडे. शिकार करीत पिल्लांचा सांभाळ करणे सूरू आहे.
हे कुटुंब असे या परिसरात असतांना वाघीनीच्या मागावर ताडोबाकडून एका वाघाचा शिरकाव झाला. तो वाघीणी सोबत प्रणय करण्यास उत्सुक असल्याचे सांगितल्या जाते. पण पिल्लांचा बचाव करण्यास सतर्क असलेली वाघीण गुरगूर करीत त्यास फिरकू देत नाही. असे पाच वाघ या परिसरात फिरत असल्याने शेतीकामे ठप्प पडली आहे.
शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाही. पिके कापणीस पण काम करायला कोणी तयार नाही. रोज एका पाळीव जनावरचा फडश्या पाडल्या जातो. गावकरी हतबल म्हणून त्यांनी वन कार्यालयावर मोर्चाच नेला. वाघाचा बंदोबस्त करा. भयमुक्त शेती करू द्या. एकरी ३० लाख रुपये नुकसानभरपाई द्या. उपाय नं झाल्यास आंदोलन करणार, असा इशाराच सरपंच राजू नौकरकर व विलास नवघरे, उपसरपंच मंगेश गिरडे तसेच अमोल पर्बत, राहूल गाढवे, विजय तडस, अरुण मोटघरे आदिनी दिला आहे.
उपवनसंरक्षक हरविंदर सिंग हे लोकांना सामोरे गेले. समजूत काढली. शेवटी वाघास पकडण्याची परवानगी मिळाली. त्यासाठी चंद्रपूरवरून डॉ. खोब्रागडे व त्याची चमू दाखल झाली. पण त्यास १५ दिवस लोटले. वाढीव कुमक म्हणून मग नवेगाव नागझरा टायगर रिझर्व्ह म्हणजेच एनएनटीआरची चमू बोलावण्यात आली. आज ही चमू गिरडला पोहचली. यांस वन परीक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी दुजोरा दिला.या चमुसोबत स्थानिक वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा वाघाच्या शोधात जंगल पिंजत आहे. तीन शावक, मागे वाघीण, तिच्या पाठी वाघ व या व्याघ्र कबील्या मागोमाग वन खात्याची चमू. अश्या घडामोडी आहेत.
काल गुरुवारी रात्री गाईच्या एका वासराचा फडश्या पाडल्याचे दिसून आले. त्यामुळे हा कबीला नेमका कुठे आहे, याचा अंदाज घेतल्या गेला. केवळ वाघासच पकडण्याची परवानगी वरिष्ठ पातळीवरून मिळाली आहे. त्यामुळे नेमका वाघ शोधून तो पकडण्याचा बाका प्रसंग आहे. पण गावाकऱ्यांना दिलासा द्यायचाच असा चंग वन खात्याने बांधला आहे.