वर्धा: दोन दिवसांतील पावसाचा सर्वाधिक फटका हिंगणघाट भागास बसला असून या भागातील असंख्य गावे ओलीचिंब झाल्याचे चित्र आहे. पूर नियंत्रण कामे नं झाल्याने अनेकांवर संकट ओढवले असून पुरात अडकलेल्या चार व्यक्तींना वाचविण्याचे कार्य युद्ध पातळीवर सूरू आहे. हिंगणघाट तालुक्यातील चानकी गावात चार व्यक्ती जीवन मरणाचा लढा देत आहे. बचाव पथक शर्थ करीत असल्याचे प्रशासन सांगते.
जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणतात की पावसामुळे सर्वाधिक हानी हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात झाली आहे. पुरामुळे अनेक रस्ते ठप्प तसेच वाहतूक खोळंबा झाल्याचे जिल्हाधिकारी सांगतात. हिंगणघाट भागात आम्ही प्रामुख्याने लक्ष ठेवून असल्याचे त्या म्हणाल्या. हिंगणघाटची रस्ते बंदची यादी थक्क करणारी आहे. या तालुक्यातील उमरी पिंपळगाव, हिंगणघाट ते मुरबाड, सुलतानपूर, सोनेगाव राऊत, नवीन बोरगाव, कोसूरला, आलमडोह अल्लीपूर, चानकी, हिंगणघाट कुंभी, पागडी सावंगी. तसेच याच मतदारसंघातील समुद्रपूर भागात दैना उडाली आहे.
नंदपूर खूनी, पिंपळगाव वडगाव, विखनी दासपूर, सावंगी देरडा, मंदपूर पार्डी ही गावे वाहतूक ठप्प पडल्याने संकटात आहेत. यामुळे रोष व्यक्त होत असलेले आमदार समीर कुणावार म्हणतात की मी सर्व स्थितीचा आढावा घेत आहे. आज सकाळी सर्व तहसीलदार, मंडळ अधिकारी व अन्य लोकांची व्ही सी बैठक घेतली. वारंवार पूर येणाऱ्या गावांची संख्या कमी झाली आहे. देवळीत पूर आढावा बैठक घेऊन कामी मार्गी लागल्याने पूर प्रमाण कमी झाले तसे हिंगणघाट मध्ये कां होत नाही ? या विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देतांना आमदार कुणावार म्हणाले की असा दुराग्रह ठीक नाही. मी अनेक वर्षांपासून आमदार आहे. नेहमी पूर येणाऱ्या गावातील कामे मीच मार्गी लावली. पाऊस खूप झाला म्हणून स्थिती बिघडली, असा खुलासा आमदार कुणावार करतात.
जिल्ह्यात आज पावसाची हजेरी सर्वांची भंबेरी उडवून गेली आहे. आर्वी तालुक्यात शिरपूर खडकी, सुकळी भाडोद, कासारखेडा मजरा मार्ग बंद पडले आहे. कारंजा तालुक्यात बोन्दरठाणा रजनी व सवारडोह ते आजनादेवी मार्ग बंद. आष्टी तालुक्यात नरसापूर खडकी मार्ग बंद पडला आहे. वर्धा तालुक्यात वर्धा तळेगाव व अंदोरी कोल्हापूर रस्ता बंद पडला आहे. आर्वी, आष्टी तालुक्यात १२ घरे पडली. तसेच वीज पडून एक गाय ठार झाली. नांद व लाल नाला प्रकल्पतून पाण्याचा विसर्ग सूरू झाल्याने परिसरातील गावांना सतर्क करण्यात आले आहे.