वर्धा : साहित्य संमेलन म्हणजे लेखक, कवी व साहित्याप्रेमी मंडळींनी एकत्र येण्याचा एक उत्सव. यात लेखक व वाचकात संवाद साधल्या जातो. महाराष्ट्रास साहित्य संमेलनची जुनी परंपरा आहे. सर्वप्रथम न्या. महादेव गोविंद रानडे यांनी १८७८ साली मराठी ग्रंथकार संमेलन सूरू केले होते. पुढे नावे बदलत गेली. ग्रंथकार संमेलन, महाराष्ट्र साहित्य संमेलन व शेवटी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

तसेच या मुख्य संमेलनसोबतच अन्य साहित्य संमेलन पण आयोजित होत असतात. बाल साहित्य, अपंग, झाडीबोली, वऱ्हाडी, शेतकरी व अन्य संमेलने आपण पाहतोच. आता एका नव्या संमेलनाची त्यात भर पडणार. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत हे साहित्य संमेलन आयोजित केल्या जात आहे.

महाराष्ट्रातील हे पहिले वाचन संस्कृती जिल्हा साहित्य संमेलन वर्धा येथे नोव्हेंबर महिन्यात होवू घातले आहे. या संमेलनाच्या आयोजनाचा पहिला मान येथील लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या लोक महाविद्यालयास देण्यात आला आहे. संमेलनाच्या नियोजनबाबत प्रथम बैठक लोक महाविद्यालयच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. संमेलनाचा हेतू काय ? या बाबत सांगतांना डॉ. राजेंद्र मुंढे म्हणाले की वाचन संस्कृतीस चालना देण्यासाठी राज्यभर शासन पुरुस्कृत जिल्हा साहित्य संमेलने आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा हा एक उपक्रम आहे. संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे वाचन संस्कृतीचा जागर अधिक वेगवान करणे.

महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे अध्यक्ष असलेले संमेलन आयोजक डॉ. गजानन कोटेवार म्हणतात की आजच्या डिजिटल युगात पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करीत विद्यार्थ्यात ज्ञान, चिंतनशीलता व सृजनशीलतेची निर्माण करणे क्रमप्राप्त ठरते. वाचन संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक भान, मूल्य संवर्धन करण्याचा हेतू असल्याचे डॉ. कोटेवार म्हणाले. हे संमेलन २२ व २३ नोव्हेंबरला आयोजित केल्या जाणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे व श्रीपाद अपराजित यांच्या मार्गदर्शनात संपन्न होणार.

संमेलनबाबत संपन्न स्थानिक सभेत संमेलनाची रूपरेषा, विविध सत्रांचे नियोजन, साहित्यिकांचे निमंत्रण, कार्यक्रमाचे वेळापत्रक, व विद्यार्थी सहभाग याविषयी सविस्तर चर्चा झाली. वर्धा जिल्ह्यातील नवोदित लेखक व विद्यार्थ्यांना एकत्र येत संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. प्रसिद्ध व उदयोन्मुख साहित्यिकांची व्याख्याने, चर्चासत्रे, कथाकथन, कवीकट्टा या कार्यक्रमामुळे एक व्यापक व्यासपीठ युवा वाचकांना उपलब्ध होणार आहे. नव्या पिढीला साहित्य व संस्कृतीचे मूल्य पटवून देण्याचा प्रयत्न या संमेलनातून होणार असल्याचा विश्वास आयोजक व्यक्त करतात.

प्राचार्य डॉ. महेंद्र सहारे, प्रा. मोहन सोनुरकर, प्रा. डॉ. मेघा चुटे, प्रा. सीमा परिमळ, प्रा.ढोबाळे यांनी सभेत आयोजनाचे विविध पैलू मांडले. सांस्कृतिक, स्वागत व आयोजन समितीच्या पुढाकारात हे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार सभेत व्यक्त झाला. हे पहिले वाचन संस्कृती जिल्हा साहित्य संमेलन वर्ध्यात आयोजित करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला.