वर्धा : मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची व्यवस्था केली असते. प्रत्येक धर्मात हा अंतिम निरोपाचा म्हणजेच मूठमाती किंवा अग्नी देण्याचा विधी महत्वपूर्ण मानल्या गेला आहे. मृत व्यक्तीस पण श्रद्धापूर्वक निरोप दिल्या जातो. पण मृत प्राण्यांचे काय ? या प्रश्नाचे उत्तर नाहीच. कारण त्यांच्या देहाची विल्हेवाट लावणे, एव्हढेच सर्वांना माहित. त्यामुळे मृत प्राणी किंवा पक्षी यांचे शरीर गावाबाहेर फेकून देण्याचाच प्रकार बघायला मिळत असतो. त्यामुळं दुर्गंधी पसरते, रोग उद्भवू शकतात, याचा कोणी विचार करीत नाही. उलट मरायला टेकलेल्या पाळीव प्राण्यांना तर बेवारस म्हणून दुरवर सोडून दिल्या जात असल्याचे चित्र नवे नाही.

प्राण्यांची स्मशानभूमी ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्याने असे धिंडवडे होतात. हे पाहून करुणाश्रम या अनाथ पशुच्या देखभालीसाठी कार्यरत संस्थेने आता अभिनव पूढाकार घेतला आहे. संस्था वर्धेलगत पिपरी येथे अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. याच संस्थेने प्राण्यांचा अंतिम संस्कार हा विचार मांडला आहे. प्राण्यांचा देखील शेवटचा निरोप सन्मानपूर्वक व्हावा, अशी बाब संस्थेने मांडली. पीपल फॉर ऍनिमल्स या प्रसिद्ध पशुप्रेमी संस्थेच्या वर्धा शाखेतर्फे करुणाश्रम चालविल्या जाते. याच जागेत मृत प्राण्यांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेस ‘ स्मृतिगंध ‘ असे नाव देण्यात आले आहे. या जागेत आपण आपल्या पाळीव जीवलग प्राण्यास समाधी देवू शकता तसेच स्मृती म्हणून स्मृती वृक्ष लावू शकता, अशी माहिती संस्थेचे आशिष गोस्वामी देतात.

यासाठी आवश्यक ती व्यवस्था किंवा मदत संस्था देणार आहे. हा भूतदयेचा आदर्श आविष्कार असल्याचे म्हटल्या जाते. संस्था या क्षेत्रात पशु सेवेसाठी प्रसिद्ध आहे. बेवारस पशु, जखमी पशु व पक्षी, भटकी जनावरे यांचा या ठिकाणी सांभाळ केल्या जात असतो. अपघातात जखमी पशुवर या ठिकाणी पशु वैद्यकीय डॉक्टर बोलावून उपचार होत असतात. दुरुस्त होईपर्यंत त्यांची देखभाल होते. त्याची प्रकृती ठणठण झाली की त्यास आवश्यक त्या अधिवासात सोडून दिल्या जाते. जखमी वाघ, बिबट, मोर, लांडगे, गाई, कुत्रे व अन्य पशु ईथे उपचार करण्यास आणल्या जातात. वन विभागास त्याची माहिती दिल्या जाते. त्यांच्याच मार्गदर्शनात सर्व ते नियम पाळून पशु सेवा होत असल्याचे गोस्वामी सांगतात.