लोकसत्ता टीम

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आजही विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

विदर्भात तापमानाचा पारा वाढत असतानाच अवकाळीचे नवे संकट पुन्हा येऊन उभे ठाकले आहे. तापमानाने विदर्भात जवळजवळ चाळीशी गाठली असतानाच अवकाळीचा तडाखा सुरू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा इशारा कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे रविवारी विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह वादळी पाऊस गारपिटीने हजेरी लावली.

आणखी वाचा- गडचिरोलीत ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मोठे यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर शहरात शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची पडझड झाली. तर काही परिसरात गारपीट झाली. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आज, मंगळवारी देखील पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.