गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे खाणविरोधी आंदोलन उधळून लावल्यानंतर संतापलेल्या नक्षल्यांनी पुन्हा एकदा पत्रक काढून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना इशारा दिला आहे. आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करा अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे.

छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा येथे दमकोंडवाहीच्या प्रस्तावित लोहखाणींना विरोध करत २५० दिवसांपासून आंदोलन सुरु होते. तेथून जवळच असलेल्या वांगेतुरी येथे २० नोव्हेंबरला पोलिसांनी मदतकेंद्र स्थापन केले. यावेळी आंदोलन व पोलीस आमने-सामने आले. यानंतर पोलिसांनी आंदोलन उधळून लावले. दरम्यान, आंदोलनाच्या सुरुवातीला ११ जून रोजी धर्मरावबाबा आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन खाणविरोधी भूमिकेला समर्थन दिले होते. मात्र, नंतर सत्तानाट्यात त्यांना मंत्रिपद मिळाले.

हेही वाचा – पुणे : मुंढवा भागात अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर अत्याचार; मित्र, नातेवाईकासह तिघांवर गुन्हा दाखल

आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला केला, २१ जणांना ताब्यात घेतले. मात्र, मंत्री आत्राम हे मौन धारण करुन बसले आहेत. आता मंत्री आत्राम यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रकाद्वारे केले आहे. मंत्री आत्राम यांनी कॉर्पोरेट घराण्यांच्या हितासाठी धारण केलेले मौन योग्य नाही, त्यांनी मौन सोडावे. मंत्रिपद केवळ आठ महिन्यांसाठीच आहे. यासाठी जनतेची परीक्षा पाहू नये अन्यथा जनता माफ करणार नाही, असा इशाराही श्रीनिवास याने दिला आहे. यासंदर्भात मंत्री आत्राम यांना विचारणा केली असता ते म्हणाले, या जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. या पत्रकाला मी महत्त्व देत नाही. या भागाचा विकास करणे याला मी प्राधान्य देतो. तर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलिसांवरील आरोप फेटाळून लावले आहे.

हेही वाचा – उत्तर महाराष्ट्र, विदर्भात गारठा कायम; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात वाढीचा अंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोदीनटोला चकमकीचा निषेध

बोदीनटोला (ता.धानोरा) येथे १४ डिसेंबरला दोन नक्षल्यांचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला होता. याचा उल्लेख करत या पत्रकात पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित करुन निषेध नोंदविला आहे. १४ डिसेंबरला पोलीस व नक्षल्यांत चकमक झाली होती. यात जहाल नक्षलवादी दुर्गेश वट्टे व राकेश हे दोघे ठार झाले होते. चार वर्षांपूर्वी जांभुळखेडा येथील स्फोटात १५ पोलीस शहीद झाले होते. या स्फोटाचा दुर्गेश वट्टे हा मास्टरमाईंड होता.