वाशीम जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना नाकारून नवयुवकांच्या हाती सत्तेची सूत्रे दिली. वाशीम तालुक्यात शिवसेना ठाकरे गट, रिसोडमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख, मालेगावात काँग्रेस तर कारंजा, मंगरूळपीर आणि मनोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सरपंच निवडून आले. सहाही तालुक्यात भाजपला मात्र मतदारांनी नाकारले असून जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला दिसून आला.
हेही वाचा >>>Maharashtra Assembly Winter Session: उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, म्हणाले “चोरी केली असेल…”
जिल्ह्यातील एकूण ९ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्यामुळे जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडले होते. आज २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. सहाही तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये सदस्यत्वासाठी तब्बल ५ हजार ४४७ उमेदवार रिंगणात होते. २७८ ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली असून गावाचा कारभारी होण्यासाठी तब्बल १ हजार ४३९ उमेदवार निवडणूक मैदानात शड्ड ठोकून होते. या निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसला असून काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली तर जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार असतानाही सरपंचपदाच्या निवडणुकीत मागे पडली. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना डावलून नवख्या तरुणांना पसंती दर्शवली.