बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील पाडळी व परिसरातील गावांमध्ये आज २२ सप्टेंबरच्या सकाळी ढगफुटीसदृश्य पावसाने थैमान घातले आहे. आज सोमवारी, सकाळी तब्बल दीड तास बरसलेल्या या कोसळधार मुळे शेकडो हेक्टर शेत जमिनीत पाणी साचले. तसेच पैनगंगा नदीला पूर आला असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार व चिखली हे तालुके ढग फुटी सदृश्य पावसाचे हॉट स्पॉट झाले आहे. आज२२ सप्टेंबर रोजी बुलढाणा तालुक्याचा सुध्दा त्यामध्ये समावेश झाला आहे.बुलडाणा तालुक्यातील पाडळी, गिरडा, चौथा, अटकळ, गुम्मी, व इजलापुर या गावांमध्ये आज २२ सप्टेंबर रोजी सकाळी ढग फुटी सदृश्य पाऊस पडला आहे. यामध्ये पैनगंगा नदीला पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे.
पाडळी शिवारातील तलाव तुडुंब भरला असल्यामुळे त्या तलावाचे व पैनगंगा नदीचे पाणी बाजूच्या शेतांमध्ये शिरले आहे. शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. या भागात जवळपास दीड तासांपेक्षा अधिक वेळ पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कापणीला आलेला उडीद, सोयाबीन व उभ्या असणाऱ्या मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या स्थितीत शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. बुलढाणा तहसीलदार कुमरे यांच्या निर्देशनंतर पाडळी विभागाच्या तलाठी यु.आर.इंगळे भागाची पाहणी करण्यासाठी पोहचल्या आहेत.
जिल्हा प्रमुखांची भेट
दरम्यान पावसाच्या या तांडवाची माहिती कळताच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत हे पाडळी गावात पदाधिकाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी पाडळी, चौथा, अटकळ आदि गावांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच बाधित शेतकऱ्याना दिलासा दिला. गावातून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून कुठलेही निकष न लावता मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.