वर्धा : हम भारत के लोग या बॅनरखाली निघालेली पदयात्रा कार्यकर्त्यांच्या पायी चालण्याने लक्ष वेधून गेली. महाविकास आघाडीचे नेते होतेच पण त्यापेक्षा अधिक कोणताच पक्षीय आवेश नसणारेच अधिक. त्याची फलश्रुती काय, ते आज कोणी सांगणार नाही. पण पत्रकार परिषदेत मात्र एक चेहरा उजळून निघाला. सर्व नेते उपस्थित पण एक चेहरा नव्हता. तुषार गांधी यांची हजेरी दिसत नसल्याचे पाहून त्यांची विचारणा झाली. तेव्हा उत्तर आले की पायी चालतांना ते मागे पडले. गाडीत बसून निघू, पत्रकार वाट बघत आहे, असे सांगितले तेव्हा म्हणाले की पायीच येतो तुम्ही सूरू करा. ही बाब ही यात्रा खरीच पायी निघाल्याचे उपस्थित सगळ्यांना पटवून गेली. गांधी आणि आंबेडकरांच्या मार्गावर चालण्यासाठी त्यांनी लोकांना ‘साद’ घातली आणि हजारो लोक पाऊस, ऊन व दसऱ्याच्या सणाचा विचार न करता २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या काळात उन्हात चालले.

पदयात्रेत तुषार गांधी लोकांशी संवाद साधत. पण एक आजीचा आलेला अनुभव सगळ्यांना चकित करून गेला. समारोप झाल्यानंतर गांधींनी लावलेल्या पिंपळ वृक्षाखाली तुषार गांधी निवांत बसले होते. तेव्हा एक ८८ वर्षीय आजी काठी टेकवत पोहचली. गांधींबाबा पायला. त्याने खूप केले. त्याचा पणतू दाखवा, भेटायचे आहे. लय हाल होत आहे. पोराचे शेत पावसानं खराब झाले. मदत देईन कां थो. असा प्रश्न आणि सर्व चकित. “गांधींचा पणतू कुठाय?” असे विचारत ८५ वर्षांची आजी रणरणत्या उन्हात त्यांना शोधत आली. आपली कैफियत गांधींच्या पणतूला सांगता आली याचं समाधान त्या आजीच्या चेहऱ्यावर झळकत मात्र होतं.

स्थानिक संयोजक अँड. अविनाश काकडे म्हणतात की महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरूनही विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते यात सामील झाले होते.हर्षवर्धन सपकाळ, खासदार अमर काळे, माजी खासदार विद्या चव्हाण, वर्षा निकम, शिवसेनेच्या सुषमा अंधारे, उत्तर प्रदेशचे सामाजिक कार्यकर्ते हिमांशु कुमार, रांचीचे प्रवीर पीटर, मध्य प्रदेशचे माजी आमदार सुनीलम, कर्नाटक सरकारचे मंत्री बी.आर. पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान, माजी मंत्री राजेंद्र मुळीक, माजी मंत्री सुनील केदार, रणजीत कांबले, अनिस अहमद, विकास ठाकरे ,अनंत मोहोड ,चारूलता टोकस यांची हजेरी लागली.

लुधियानाहून शहीद भगतसिंग यांच्या बहिणीचे पुत्र जगमोहन सिंह, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, पत्रकार निरंजन टकले, आंबेडकरी चळवळीचे नेते शामदादा गायकवाड, शाम निलंगेकर, अतुल शर्मा, सुदाम पवार, पत्रकार विकास झाडे, गुड्डी, फिरोज मिठीबोरवाला, शरद कदम, अली भोजानी, मधुरा पाध्ये, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख, मायाताई वाकोडे, राजाभाऊ अवसक, बाबा नदाफ, नितीन वाळके हे पण उपस्थित होते.

तुषार गांधींनी नुकतंच “हम भारत के लोग” हे व्यासपीठ सुरू केलं आहे. सामाजिक न्यायाच्या लढाईत लोक संघटित व्हावेत, संविधानाचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी नागपूर ते वर्धा या ९० किलोमीटरच्या अंतरावर पायी चालत लोकांमध्ये आशेची पणती पेटवली. रोज २५ ते २८ किलोमीटर लोक चालले. ही यात्रा कायम स्मरणात राहील, तुषार गांधी यांच्या साधेपणात लोकांना एक आश्वासक नेतृत्व दिसले, असे मत काकडे व्यक्त करतात.