निमखेडी ( जि. बुलढाणा) : जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथे दोन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या भारत जोडो पदयात्राने आज, बुधवारी बुलढाणा जिल्ह्यासह महराष्ट्राचा निरोप घेतला. सकाळी मध्यप्रदेशच्या सिमेत दाखल होताच यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी मध्यप्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. कमलनाथ यांच्या हाती यात्राध्वज व यात्रेची पुढील धुरा सोपवण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांनी यात्रेच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल महाराष्ट्राला ‘ए प्लस’ मानांकन जाहीर केले.

आज, २३ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता निमखेडी येथून पदयात्रेने प्रस्थान ठेवले. पुढील मार्ग जंगळव्याप्त व नागमोडी घाटांचा असल्याने ही यात्रा वाहनांनी रवाना झाली. मध्यप्रदेशमधील सारंगपूर येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. तेथे उभारण्यात आलेल्या साध्या व्यासपीठावर सुताच्या हाराने राहुल गांधी यांचे स्वागत झाले. यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यात्रा समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी खा. कमलनाथ यांच्या हाती यात्राध्वज सुपूर्द केला. या दोन्ही नेत्यांच्या मनोगतानंतर कमलनाथ यांनी मध्यप्रदेशमधील ३७० किलोमीटरची यात्रा यशस्वी ठरणार असल्याचा दावा केला.

हेही वाचा: Nagpur University: निवडणूक मतमोजणी केंद्रावर दोन प्राचार्यांमध्ये मध्यरात्री राडा; कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत जोडो यात्रा भीती, बेरोजगारी व महागाईविरोधातील आवाज
ही यात्रा म्हणजे, सत्ताधा-यांनी सर्व समाज घटकांत निर्माण केलेली भीती-दहशत, बेरोजगारी व महागाईविरुद्धचा जनतेचा आवाज असल्याचे राहुल गांध यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात यात्रेला व दोन जाहीर सभांना मिळलेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. यामुळे राज्य ‘ए प्लस’ मानांकनचा मानकरी ठरला, असे ते म्हणाले. त्यांनी पाच वर्षीय रुद्र नामक बालकाला व्यासपीठावर बोलावून बोलते केले. त्याने डॉक्टर व्हायची इच्छा असल्याचे सांगितले. रिना नामक महिलेला व अन्य नागरिकांना काँग्रेसच्या काळातील इंधन, घरगुती गॅस यांचे दर विचारले. नरेंद्र मोदी यांचे सरकार गोरगरीब, शेतकरी, कामगार, सामान्य नागरिकांचे नसून मूठभर उद्योजकांचे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, आदी मोजक्याच नेत्यांची उपस्थिती होती.