नागपूर: पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात चार दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्याचा निषेध जगाने नोंदवला. त्यानंतर काही कालावधीतच या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे कळले होते. ज्यानंतर भारताने ६ आणि ७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने बुधवारी पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील तब्बल नऊ दहशतवादी तळांवर कारवाई केली. त्यानंतर बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर व पश्चिम भागांतील लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संरक्षण दलांनी तो यशस्वीरित्या हाणून पाडला. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने त्याच दिवशी पाकिस्तानातील लाहोरमधील हवाई हल्लाविरोधी संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. यानंतर आता आयपीएल मॅचही रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरालाही अलर्ट देण्यात आले. त्यामुळे युद्धाचा एमपीएससी, यूपीएससी परीक्षांवर काय परिणाम होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देशातील सध्याची सुरक्षा आणि तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, मे २०२५ मध्ये होणाऱ्या उर्वरित सीए परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी महत्त्वाची घोषणा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने केली आहे. या निर्णयाचा एक भाग म्हणून, चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स परीक्षा – ज्यामध्ये इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट समाविष्ट आहे. त्यानंतर शनिवारी एमपीएससीच्या काही ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. यात माहिती संचालनालयाच्या परीक्षेचा समावेश आहे. नुकतेच मुंबई शहराला अलर्ट देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या परीक्षेवर काय परिणाम होणार असा प्रश्न सर्व उमेदवारांच्या मनात आहे. याशिवाय पुढील आठवड्यातही काही परीक्षा होणार आहेत. मे महिन्यात यूपीएससीची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षा तुर्तास स्थगित होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात एमपीएससीच्या संपर्क क्रमांकावर माहिती विचारली असता तुर्तास कुठल्याही परीक्षा स्थगित होण्याच्या सूचना नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, एमपीएससीकडून अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढून परीक्षांच्या स्थितीबद्दल आयोगाने माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे आयोग यावर काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे महावितरणच्या परीक्षा मे महिन्यात होणार आहेत.