नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही वाळू माफिया, अवैध व्यावसायिक, अंमली पदार्थ तस्करी सोबत जनावरांच्या तस्करांनीही उच्छाद मांडला आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाने अवघ्या सहा महिन्यांत २५० वाळूमाफियांवर कारवाई केली. तर दुसऱ्या बाजूला ७२ गुंडांवर हद्दपारीचा बडगा उगारत ७ संघटीत गुन्हेगार आणि ५ जणांना मकोकाचा दणका दिला.
२०२४ च्या तुलनेत ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाने सर्वाधिक ३४२ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली. वाळी माफीयांच्या कारवयांमध्येही २०२४ मधील २२१ च्या तुलनेत चालू वर्षात अवघ्या सहा महिन्यांत २५० वाळू माफियांना धडा शिकवला गेला. ग्रामीण हद्दीतून जानेवारी ते जूलै या काळात बेकायदेशीररित्या जनावरांची तस्करी करणाऱ्या ८८ जणांवर कारवाई करण्यात आली. गेल्यावर्षी २०२४ मध्ये जनावरांच्या तस्करीच्या ७६ घटना उघडकीस आल्या होत्या.
या खेरीज ग्रामीण पोलीस अधिक्षकांच्या हद्दीत जुगारांचे अड्डे उध्वस्त करीत ४२८ जुगारींवर कारवाई करण्यात आली. बेकायदेशीररित्या हातभट्टी, मोहफुलाची दारू गाळणाऱ्या १९९४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी हेच प्रमाण १८९२ इतके होते.
टोळी तयार करून संघटीत स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या ९२ गाव गुंडांवर ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी चालू वर्षात आतापर्यंत एम.पी. डी. ए., हद्दपार, मकोका आणि पिटा सारख्या कायद्यानुसार कारवाई केली. गेल्या वर्षी २०२४ मध्ये ६१ तर त्यापूर्वी २०२३ मध्ये अवघ्या ३५ गुंडावर कारवाई झाली होती. चालू वर्षात संघटीत गुन्हेगारांवर सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या.
पोलीस भवनातल्या ग्रामीण जिल्हा पोलीस मुख्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. तीत नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के आदी उपस्थित होते.
प्राणांतिक अपघात प्रमाण १० टक्क्यांनी घटले
जिल्ह्यातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण पोलीसांनी सेव्ह लाईफ फाऊंडेशनशी सामंजस्य करार करीत प्राणांतिक अपघाताच्या ७ अपघात प्रवण स्थळांवर काम केले. जीवेघेणे अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या ७ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेऊन भौगोलिक सुधाकरणा करण्यात आली. यातून २०२४ च्या तुलनेत अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी तर प्राणांतिक अपघातांचे प्रमाण ९ टक्क्यांनी कमी करण्यात यश आले.