लोकसत्ता टीम

वर्धा : नात्यागोत्याचा दाखला देत उमेदवार व त्याच्या सहकाऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नेते करतात. इथेही तसेच होत आहे. आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचे सख्खे मामा म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख होत. मूळचे काँग्रेसी असलेल्या अमर काळे यांना स्वपक्षात वेळेवर पवन करून घेत त्यांच्यावर वर्धा लोकसभा मतदारसंघात लढण्याची जबाबदारी टाकण्यात आली. भाचे अमर काळे यांनी मामाकडे पाहून आश्वस्त होत ती स्वीकारली. आता प्रचार जोमात सुरू असून सर्व ती सूत्रे मामा देशमुख यांच्या कडे आहे.

आणखी वाचा-राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…

शुक्रवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रात्री कार्यालय असलेल्या डॉ. शिरीष गोडे यांच्या घरी थांबले. यावेळी निवडक नेते मंडळीसोबत पाटील यांनी संवाद साधला. ते म्हणाले की पक्षाने योग्य उमेदवार निवडला याची पावती मिळत आहे. त्याचा परिणाम दिसत आहे. पोल मध्ये तसे दिसत आहे. मात्र मतदान होईपर्यंत ते टिकवावे लागेल. मामाने भाच्याची क्षमता ओळखली. ते पाठिशी आहेच त्यामुळे चिंता नसावी. मात्र सावध असावे. तीन पक्ष आहेत. त्यामुळे कुरबुरी असतीलच. पण त्या बाबी सार्वजनिक ठिकाणी बोलू नये. समविचारी मिळून लढत आहोत. अनेक गट असतात. प्रत्येकाचा मानसन्मान असतो. तो जपल्या जावा. तक्रारी खाजगीत सांगाव्या. नेत्यांनी हे पथ्य पाळावे. जनतेत या बाबी जाऊ नयेत. त्याची दक्षता घ्यावी, अश्या सूचना पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत केल्या.

इंडिया आघाडीचे निमंत्रक अविनाश काकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, डॉ. गोडे, राष्ट्रवादीचे समीर देशमुख, अतुल वांदिले, सुनील राऊत व अन्य नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी मामा अनिल देशमुख यांनी भाचा अमर काळे याच्या प्रचाराबद्दल विशेष गांभीर्य दाखविले.