नागपूर : गेल्या दोन आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात एक वाघीण सातत्याने दुचाकी वाहनांवरुन जाणाऱ्यायेणाऱ्यांवर हल्ला करत आहे. यात काही जखमीही झाले आहे. ती रस्त्यावर येऊ नये म्हणून आता जाळी लावण्यात आली आहे. यापूर्वीही अनेक ठिकाणी वाघीण आक्रमक होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, वाघीण आक्रमक का होते, यामागील अनेक कारणे आहेत. खरे तर वाघ देखील वेळप्रसंगी आक्रमक होतात, पण यात वाघिणीचे प्रमाण अधिक असल्याचे काही उदाहरणांमध्ये दिसून आले.

‘के मार्क’ मुळात आक्रमक नाहीच…

मूल-चंद्रपूर मार्गावर ‘के मार्क’ नावाची वाघीण या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांवर हल्ले करत आहे. मात्र, या वाघिणीच्या तीनपैकी एका बछड्याचा याच मार्गावर काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात वाहनाखाली येऊन मृत्यू झाला. तिच्या मृत बछड्यावर वनखात्याने नंतर करण्यात येणारे सोपस्कार केले, पण वाघिणीला बछड्याचा मृत्यू स्वीकारणे शक्य झाले नाही. याच मार्गावर एका वाहनाने तिच्या बछड्याला उडवल्याने ती सर्वच वाहनांवर हल्ला करत आहे. प्रत्यक्षात या वाघिणीचा मूळ स्वभाव आक्रमक नसल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ‘अवनी’ वाघिणीप्रमाणे वनखात्याने तिचा बळी घेतला नाही. तर तिला रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना केली.

‘अवनी’चा नाहक बळी…

काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ‘अवनी’ वाघिणीला ठार मारण्यात आले. १४ व्यक्तींवर हल्ला करुन त्यांना यमसदनी धाडल्याचा ठपका या वाघिणीवर ठपका ठेवण्यात आला. प्रत्यक्षात ही वाघीण अतिशय शांत होती. या जंगलात हरीण, ससे यांच्या शिकारीसाठी गावातील लहान शिकारी जात असत. यादरम्यान, ती गर्भवती असताना तिला तिच्या गर्भातील बछड्यांची काळजी होती. त्यांनाही कुणी मारणार तर नाही ना, या भीतीने ती हल्ले करत होती. तर बछडे झाल्यानंतरही तिला जंगलात शिरणाऱ्या शिकाऱ्यांचा धोका तिला जाणवत होता. प्रत्यक्षात या वाघिणीने १४ माणसांचा बळी घेतलाच नाही. कारण या परिसरात इतरही वाघ होते आणि त्या वाघांच्या हल्ल्यात ते मृत्यू झाले होते. मात्र, या वाघिणीच्या नावावर त्या १४ बळींचा ठपका ठेवून तिचाही बळी घेण्यात आला.

‘माया’ही तशी नव्हतीच…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘माया’ या वाघिणीने व्याघ्रगणनेदरम्यान महिला वनरक्षकाचा बळी घेतला. तर पर्यटक असलेली जिप्सी तिच्याजवळ थांबल्यानंतर या जिप्सीवर तिने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीसुद्धा ती गर्भवती असल्याने, बछडे लहान असल्यानेच तिच्याकडून हल्ल्याचे प्रयत्न झाले होते. ‘माया’ ही जगप्रसिद्ध वाघीण देखील मुळात आक्रमक नव्हतीच.