भंडारा: धानपीक कापणीसाठी गेलेल्या महिला मजुरांना शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ दिसताच महिला मजुरांची भंबेरी उडाली आणि त्यांनी गावच्या दिशेने पळ काढला. तुमसर तालुक्यातील सोनेगाव येथे आज  १७ मे रोजी सकाळी ८ वाजता वाघाचा शेत शिवारातील पळतानाची चित्रफीत प्रसारित झाली.

सध्या सिहोरा परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धान पिकाची कापणी सुरू असून सोनेगाव येथील शेतकरी मनलाल चव्हाण यांच्या शेतात काही महिला मजूर धान कापणीसाठी गेले असता त्यांना शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यावेळी महिलांनी जीव मुठीत घेऊन शेतातून पळ काढला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी वाघ बघण्यासाठी शेतात मोठी गर्दी केली. वाघाला पाहताच लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. लोकांच्या आवाजाने वाघ सैरावैरा पळू लागला. सुदैवाने शेतात कुणी नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तुमसर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले, वनरक्षक डी. ए. काहुडकर, आर.ओ. डेहनकर, वनरक्षक एच. एम. आहाके, आर.डी.चौधरी, ए. जे. वासनिक, ए. एस. सेलोकर तसेच सिहोरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.

Video: शेतात सुरू होती धानकापणी…समोर उभे ठाकले साक्षात वाघोबा….

हेही वाचा >>>सावधान! राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

या वाघाने एका रानडुकराची शिकार केली आहे. त्यामुळे तो परिसरातच दबा धरून बसला आहे. वाघाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.   शोधमोहीम सुरू असताना त्यांना शेतात वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या. दरम्यान नागरिकांचा आरडाओरडा ऐकून शेतात लपलेल्या वाघाने शेताजवळील नाल्यात पळ काढला असून   वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग व पोलीस विभागातील कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. दरम्यान त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी भंडारा येथील आर. आर. टी. पथकाला पाचरण केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>एमपीएससी: लिपिक-टंकलेखक परीक्षेतील गोंधळाबाबत मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना कारवाईचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आधी २०२० मध्ये गोंदेखारी शेतशिवरात वाघाने एका व्यक्तीला जखमी केले होते. गावकऱ्यांनी या वाघाला जंगलाचे दिशेने पळवून लावले. सायंकाळ होताच गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे बंद होते.  ग्रीन व्हॅली चांदपूच्या विस्तारीत आणि संरक्षित जंगलात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. बावनथडी नदीचे पात्र कोरडे पडल्याने मध्यप्रदेशातील वाघांचा या जंगलात शिरकाव होतो. वाघाचा डरकाळी फोडणारा आवाज परिसरातील नागरिकांच्या कानावर रोज पडतो. यामुळे गावात भीती निर्माण झाली आहे.