नागपूर : जीवनशैलीसह आहारात झालेले बदलासह इतर कारणांमुळे मागील दहा वर्षांत तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण ४० टक्यांनी वाढले आहे. ह्रदयविकाराच्या झकट्याने रुग्णालयात दाखलहोणाऱ्या शंभरातील तीस रुग्ण हे चाळीस वर्षाखालील असतात, असे निरीक्षण ह्रदयरोग तज्ज्ञांकडीन नोंदवले जात आहे. २९ सप्टेंबरला जागतिक ह्रदय दिन असून त्यानिमित्याने घेतलेला हा आढावा.
नागपुरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय बीडकर म्हणाले, ताणतणाव, बैठी जीवनशैली, अनियंत्रित आहार, धूम्रपान, तसेच मधूमेह आणि लठ्ठपणा या सर्व घटकांमुळे उच्चरक्तदाब आणि हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहे. उच्चरक्तदाबामुळे मेंदूला आघात, पक्षाघात, मेंदूतील रक्तस्राव, दृष्टीदोष, मूत्रपिंड निकामी होणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. हृदय व रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण येतो आणि त्यातून हृदयविकाराचे झटके येण्याचा धोका वाढतो. याशिवाय उच्चरक्तदाबग्रस्त रुग्णांमध्ये इतरही विकार मोठ्या प्रमाणात दिसतात.
उच्चरक्तदाबग्रस्त रुग्णांमध्ये आजाराचे प्रमाण (टक्यांमध्ये)
- २० टक्के रुग्णांना मधूमेह
- ३० टक्के रुग्णांना वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल
- २५ टक्के रुग्णांना जास्त युरिक अॅसिड
- ३५ टक्के रुग्णांना लठ्ठपणा
देशात प्रत्येक ३३ सेकंदात एकाचा ह्रदयविकाराने मृत्यू…
भारतात प्रत्येक ३३ सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडते. शिवाय मधूमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात असून, प्रत्येक मधूमेही रुग्णाला हृदयविकार होण्याचा धोका असतोच. याशिवाय भारतीयांची रक्तवाहिन्या पाश्चिमात्यांपेक्षा लहान असल्यामुळे ब्लॉकेज लवकर निर्माण होतात. अनेकदा एकाच वेळी दोन-तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळते. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, सततची धावपळ आणि मानसिक ताणतणाव या कारणांनीही हृदयविकार झपाट्याने वाढत असल्याचे डॉ. बिडकर यांचे म्हणने आहे.
उपाय काय?
- आहार – तेलकट, फॅटयुक्त, जंकफूड, डबाबंद पदार्थ, तसेच जास्त मीठ टाळणे आवश्यक.
- जीवनशैली – नियमित व्यायाम, ताणतणावमुक्त जीवन, योग्य वजन राखणे गरजेचे.
- नियमित तपासणी – वर्षातून किमान एकदा रक्तदाब मोजणे व वेळेत निदान करणे.
- औषधोपचार – फक्त आहार व व्यायाम पुरेसे नसतात; औषधोपचारांचीही गरज असते.
डॉ. अमेय बिडकर यांचे म्हणणे काय ?
आजची तरुण पिढी संगणक, मोबाईल, ऑफिस खुर्च्यांवर तासंतास बसून राहते. त्यामुळे ‘सिटिंग इज इंज्युरियस टू हेल्थ’ ही चेतावणी प्रत्येक खुर्चीवर असायला हवी. सलग बसणे टाळा, थोड्या वेळाने उठून चालावे, अगदी मीटिंग्ससुद्धा उभ्याने घेण्याची सवय करावी. रोज फक्त १५ मिनिटे चालणे, धावणे किंवा इतर कोणताही व्यायाम केला तरी हृदयविकाराची जोखीम १४ टक्यांनी कमी होते.
नियमित व्यायामासोबत योग्य आहार घेतल्यास उच्चरक्तदाब आणि हृदयविकार दोन्हींपासून बचाव होऊ शकतो. उच्चरक्तदाब नियंत्रणात ठेवला तर अनेक विकार आपोआप दूर राहतात. औषधोपचार + जीवनशैलीतील आणि वेळेत स्क्रिनिंग हीच उपचारांची त्रिसूत्री आहे, असे मत डॉ. अमेय बीडकर यांनी व्यक्त केले.