वर्धा : राज्य, राष्ट्रीय व मग आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे देशाला कौतुकच. दिव्या देशमुखने गगनभरारी केली. त्याची चांगलीच चर्चा झाली. आता दुसरी एक कन्या सध्या जग जिंकून आली. ७६ देशातील स्पर्धाकांचा सामना करीत तिने हे यश प्राप्त केले आहे. सोने लुटून भारतात परतणाऱ्या या कन्येचे नाव आहे सुनयना डोंगरे.
त्या वर्धा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. खेळाडू म्हणून त्या जिल्ह्यास खाश्या परिचित. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम २०२५ या स्पर्धा इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे संपन्न झाल्या. त्यात जगातील ७६ देशांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सुनयना डोंगरे यांनी एक सुवर्णपदक व एक रौप्यपदक पटकवले. फिजिक व बिकिनी अश्या गटात त्यांना हे पदक प्राप्त झाले. अंगावर तिरंगा लपेटून त्यांनी पदक स्वीकारले. त्यांचे पोलीस दलात अभिनंदन होत आहे. सामान्य भारतीयांना या वर्ल्ड पोलीस अँड फायर स्पर्धाचे महत्व कदाचित माहित नसेल. मात्र क्रीडा क्षेत्रात यांस खास महत्व आहे.
सुनयना यांचा प्रवास थक्क करणारा आहे. खेडेवजा सेलूगावात त्यांचे वास्तव्य. पिढीजात मासेमारीचा व्यवसाय. शिक्षण दूरच. स्थानिक शाळेत शिकत असतांना त्यांना खेळाची आवड निर्माण झाली. वडील विष्णुजी डोंगरे यांनी प्रोत्साहन दिले. मग याच स्पोर्ट्स कोट्यातून त्यांची पोलीस दलात निवड झाली. एकदा धाव स्पर्धेत पाय दुखावला. करायचे काय, हा प्रश्न. म्हणून मग हटके क्षेत्र निवडले. २०२२ मध्ये शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकाराचा सराव सूरू केला. आईने चांगले डायट देण्याची जबाबदारी घेतली. नाशिक पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. त्या आधारे मग लखनौ ईथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत भरारी घेतली. हे यश त्यांना आंतरराष्ट्रीय कामगिरीसाठी पात्र करणारे ठरले. काहीच दिवसात दिल्लो पोलिसकडून त्यांना फोन आला की पासपोर्ट तयार ठेवा. इंग्लंडमध्ये ‘ गेम्स ऑफ हिरोज ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांची निवड जानेवारी महिन्यात झाली. आणि आता या स्पर्धेत त्या दोन पदके खेचून मायदेशी परतल्या. हा आयुष्यातील सर्वोच्च गौरव क्षण, असे त्या सांगतात.
ही सुवार्ता कळताच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्याशी डोंगरे यांची भेट झाली. उपस्थित सर्वांसमोर तीचे अभिनंदन करण्यात आले. पालकमंत्री म्हणाले की जिल्ह्याचेच नव्हे देशाचे नाव उंचावणारे हे यश आहे. त्याची कदर केल्या जाईल. पदोन्नतीबाबत तरतुदी तपासून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. तुम्हास पोलीस इन्स्पेक्टर करण्यास सर्व ते प्रयत्न करू, अशी हमी पालकमंत्र्यांनी दिली. आपली भावना व्यक्त करतांना सुनयना यांनी आजवर आईवडिलांच्या मदतीने केलेली धडपड कामात आल्याचे मत व्यक्त केले. या वाटचालीत जिल्हा पोलीस प्रशिक्षक राजूभाऊ उमरे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद हिवाळे यांची मोलाची मदत झाली. मुलींनी या क्षेत्रात पण पुढे आले पाहिजे, असे त्या म्हणतात. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी त्यांचे अभिनंदन केले.