अमरावती : चिखलदरा या विदर्भातील एकमेव थंड हवेच्या ठिकाणी जाताना मोथा गावाजवळ जगातील पहिले गणपती संग्रहालय उभारण्यात आले आहे. सुमारे अडीच एकर क्षेत्रात विस्तारलेल्या या संग्रहालयात विविध आकाराच्या देश-विदेशातील सुमारे ६ हजार गणेशमुर्ती आहेत.
चिखलदरा नजीकचे गणपती संग्रहालय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या ठिकाणी एकाच छताखाली सहा हजार गणेशमुर्ती आहेत. विदेशातील इंडोनेशिया, बँकॉक, सिंगापूर, चीन, नेपाळ येथून आणलेल्या गणेशमूर्तींचा त्यात समावेश आहे. पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देतात. चिखलदरापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर हे नंद उद्यान – गणपती संग्रहालय आहे. या ठिकाणी संग्रहित गणेश मूर्तींमध्ये पितळ, तांबा, काच, फायबरच्या मुर्ती आहेत.
अतिशय सूक्ष्म म्हणजे दुर्बीणमधून पाहण्यासारखे गणपती मोहरीवर, तिळावर, तांदळावर, पेन्सिलच्या टोकावर कोरीव गणपती, खडूंवरील गणेश शिल्प, औषधाच्या गोळ्यांचा गणपती, फुलांच्या पाकळ्यांचा गणपती अशा अनेक मूर्तींचा समावेश आहे. अकोला येथील व्यावसायिक प्रदीप नंद आणि त्यांच्या पत्नी दीपाली नंद यांना गणपती बाप्पांच्या विविध रुपातील आणि वेगवेगळ्या आकारातील गणेशमुर्ती संग्रहित करण्याचा छंद होता.

देश-विदेशातून आणलेल्या २ हजारावर गणेशमूर्तींचा संग्रह झाल्यावर त्याचे संग्रहालय करण्याची कल्पना त्यांना सुचली. चिखलदरा नजीक त्यांनी २०२०-२१ मध्ये हे संग्रहालय उभारले. आता या ठिकाणी सहा हजार गणेश मूर्तींचा संग्रह झाला आहे. पर्यटकांना नाममात्र शुल्क भरून हे संग्रहालय पाहता येते.
आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने प्रदीप नंद आणि दीपाली नंद हे दाम्पत्य भारतभर फिरत असताना काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरातच्या किनाऱ्यापासून ते आसाम, वाराणसी, ओडिशा, कर्नाटक, केरळ येथे असणाऱ्या विविध शैलीतील गणपतींच्या मूर्ती त्यांनी खरेदी केल्या आणि या संग्रहालयात अतिशय सुसज्जपणे मांडल्या. या संग्रहालयात भारताच्या विविध भागासह चीन, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, थायलंडसारख्या देशामध्ये असणाऱ्या विविध स्वरूपातील गणपतीच्या मूर्ती देखील आणण्यात आल्या आहेत.
काच, माती दगड, लाकूड धातू फायबर अशा विविध माध्यमात बनविलेल्या गणेश मूर्ती या संग्रहालयात पाहायला मिळतात. गणपतीची नाणी देखील या संग्रहालयात आहेत. अगदी बाल गणेशापासून भव्य दिव्य स्वरूपातील गणपतीचे दर्शन या संग्रहालयात घडते. क्रिकेट हॉकी फुटबॉल खेळणारे गणपती, विविध वाद्य वाजवतानाचे गणपती, २६ हजार पेन्सिल पासून साकारण्यात आलेला गणपती असेच सारे काही पाहताना पर्यटक आश्चर्यचकित होतात. या गणपती संग्रहालयाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे.