यवतमाळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा येथे झाला. या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकीचे बळ आजमाविण्याचा निर्णय घेत, आघाडी न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले.
न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. तेंव्हापासून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने आगामी पालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी विधानसभानिहाय आढावा बैठकांचे नियोजन केले आहे. याच बैठकांच्या मालिकेची सुरवात यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली. नेत्यांच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने नेतेही पुढे आले आहेत. या आढावा बैठकीत काँग्रेसची नेतेमंडळी उपस्थित होती. नेत्यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, असा शब्द दिला. या बैठकीत नेत्यांनी आम्ही सर्व एक आहोत. विरोधक काँग्रेस नेत्यांबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’चा वापर करीत असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील सर्व नेते एक दिलाने कार्यकर्त्यांच्या मागे राहणार असल्याची ग्वाही प्रत्येक नेत्यांनी यावेळी दिली. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला. मात्र एकीचा मुद्दा भाषणापुरता मर्यादित राहू नये, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बैठकीला काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार बाळासाहेब मांगुळकर, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या स्वाती येंडे, नगरसेविका वैशाली सवाई, शहराध्यक्ष बबलू देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे यांच्यासह यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
…तर स्वबळावर लढणार
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. यामुळे त्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीबाबत चर्चा नाही. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार प्रक्रिया होईल. आघाडी होईल किंवा नाही, याचा विचार न करता कार्यकर्त्यांनी तयारी करावी. आपणही स्वबळावर निवडणूक लढण्यास सक्षम आहोत, असे काँग्रेस नेत्यांनी यावेळी सांगितले.
पुसद नगराध्यक्ष पदावर भाजपचा दावा
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून पुसद नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक हालचालींना सुरवात केली आहे. पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर भारतीय जनता पक्षाने दावा केला असून पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार, अशी ग्वाही पक्ष नेतृत्वाने आढावा बैठकीत दिली. पक्ष निरीक्षक माजी आमदार नामदेव ससाने, माजी आमदार निलय नाईक, भाजप पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, शहराध्यक्ष निलेश पेन्शनवार, भाजप नेते विनोद जिल्हेवार, निखिल चिद्दरवार, विश्वास भवरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले.