यवतमाळ : समाजाला विरंगुळा म्हणून शासनाकडून ‘मनोरंजन क्लब’ या नावाखाली परवानगी घेवून त्याआड जुगार अड्डे चालविले जात आहेत. जिल्ह्यात पांढरकवडा, वणी, पुसद, उमरखेड, नेर, यवतमाळसह अनेक तालुक्यांत हे ‘सोशल क्लब’ फोफावले असून, त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे.

महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी, पिंपळखुटी हा भाग आंतरराज्यीय जुगार केंद्र म्हणून उदयास आला आहे. मात्र या जुगार अड्ड्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने ‘मनोरंजन क्लब’साठी परवानगी देण्याच्या शासनाच्या हेतूवरच शंका उपस्थित होत आहे. जुगार अड्डे चालकांशी काही पोलिसांचेच लागेबांधे असल्याची चर्चा आहे.

नागपूर-हैदराबाद मार्गावरील पाटणबोरी, पिंपळखुटी या सीमावर्ती भागात तेलंगणा, आंध्रप्रदेशातील व्यवसायिकांनी रेस्टॉरंट, बार इतकेच नव्हे तर फार्म हाऊसमध्येही असे जुगार अड्डे सुरू केले. त्यामुळे या भागात परप्रांतीय जुगाऱ्यांचा रात्रभर धुडगूस असतो. पाटणबोरी येथे गेल्या २० वर्षांपासून तेलंगणातील ‘अण्णा’ने रेस्टारंट, बार अशा व्यवसायांच्या आड जुगार अड्ड्याचे बस्तान मांडले. यवतमाळ पोलीस दलातील एका बडतर्फ पोलीस शिपायास हाताशी धरून त्याचे कारनामे सुरू असल्याचे सांगितले जाते. ‘मनोरंजन क्लब’मध्ये कुठले खेळ असावे, याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. मात्र या सूचनांचे पालन कुठेच होत नाही आणि पोलीसही अर्थपूर्ण संबंधातून त्याची पडताळणी करत नसल्याचा आरोप नेहमीच होतो. नियमानुसार, ‘मनोरंजन क्लब’ची वेळ रात्री १० पर्यंत असताना, या अड्ड्यांवर सायंकाळपासून सुरू झालेला ‘रम, रमा, रमी’चा खेळ पहाटेपर्यंत चालतो.

अदिलाबाद, हैदराबाद, निजामाबाद, आसिफाबाद, निर्मल, पांढरकवडा, यवतमाळ, घाटंजी आणि नागपूरहून ग्राहकांना ‘जॅकपॉट’ लागेल या आशेवर या ‘सोशल क्लब’मध्ये सर्व सुविधा पुरविल्या जातात. पाटणबोरी परिसराला रात्रीच्या वेळी महागड्या वाहनांसह आलेल्या ग्राहकांमुळे जत्रेचे स्वरूप आलेले असते. पांढरकवडा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या या जुगार अड्ड्यांकडे पांढरकवडा पोलिसांसह, स्थानिक गुन्हे शाखेचेही कारवाईसाठी विशेष लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होते. माध्यमांमधून बातम्या आल्यानंतर पोलीस थातूरमातूर कारवाई करतात.

पोलिसांचा छापा, पण ‘अण्णा’ निसटला!

पांढरकवडा पोलिसांनी २२ सप्टेंबरला पाटणबोरीतील ‘जॅकपॉट’ जुगारावर छापा टाकला. यात म्होरक्या असीफसह २० जुगाऱ्यांना ताब्यात घेवून कारवाई केली. मात्र, तेलंगणातील ‘अण्णा’ नेहमीप्रमाणे या कारवाईतून निसटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्यांच्यावर कारवाई झाली तेही जामिनावर सुटले. मात्र, या कारवाईनंतर अवघ्या दोनच दिवसात ‘जॅकपॉट’मध्ये ग्राहकांची वर्दळ वाढल्याने पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

कारवाईनंतर परिस्थिती ‘जैसे थे’च

पांढरकवडा येथे नव्यानेच परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रॉबिन बन्सल हे धडाकेबाज अधिकारी रुजू झाल्यापासून परिसरातील अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू आहे. मात्र, जुगारांवर धडक कारवाई होऊनही, परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘ऑपरेशन जुगार’ का नाही?

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता हे सामाजिक संवेदना जपणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. सामाजिक हितासाठी ‘ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत गेल्या वर्षभरापासून चिंता हे विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. पोलीस आणि नागरिक यांच्यात एक संवाद सेतू या उपक्रमांमुळे निर्माण झाला आहे. जिल्ह्यात डीजे, व्यसन, नशामुक्त गणपती, दुर्गोत्सव मंडळ असावे यासाठी स्पर्धाही घेतल्या आहेत. मग जिल्हा जुगारमुक्त होवून असंख्य कुटुंबांची होणारी होरपळ थांबावी म्हणून पोलीस विभागाकडून जिल्ह्यात ‘ऑपरेशन जुगार’ का राबविले जात नाही, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

पोलीस अधीक्षक म्हणतात…

या संदर्भात पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची प्रतिक्रिया घेतली असता, मनोरंजन क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा केंद्रांची परवानगीच रद्द करण्याचा पोलीस विभागाचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस विभागाकडून जुगारांवर सातत्याने कारवाई सुरू असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.