यवतमाळ : पती, पत्नी और ओ या त्रिकोणात पत्नीच्या प्रियकराच्या वडिलांचा नाहक बळी गेला. पत्नी ज्या मुलासोबत पळून गेली, त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने चिडलेल्या पतीने आपल्या मित्रांसह पत्नीच्या प्रियकराच्या वडिलांचा खून केला. वणी – घुग्गुस मार्गावर गेल्या रविवारी एका व्यक्तीचा रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील सुमठाना येथील विनायक माधव कुळमेथे (५०) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

गावातील चर्चेवरून या घटनेत तीन संशयितांना शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली तेव्हा मारेकऱ्यांपैकी एकाची पत्नी मुलाने पळविली म्हणून संबंधित तिघांनी त्या तरुणाच्या वडिलांचाच खून केल्याची खळबळजनक कबुली दिली. वणी येथील घुग्गुस मार्गावरील बेलोरा फाटा परिसरात ५ ऑक्टोबराला रात्री हा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती.

त्यावरून शिरपूर पोलिसांनी तिघांनाही अटक केली. नीलेश दिलीप ढोले (३६) रा. जुना सुमठाना, आशीष मारोती नैताम (३५) रा. राजुरा आणि निखिलेश बिंदेश्वर जाधव (५५) रा. मोरवा अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. मृत विनायक माधव कुळमेथे याच्या मुलाने आरोपी नीलेश याच्या पत्नीला महिनाभरापूर्वी प्रेमसंबंधातून पळवून नेले होते. तेव्हापासून आरोपी नीलेशसह संबंधित तिघे विनायकच्या मुलासह संबंधित महिलेच्या मागावर होते. मात्र ते दोघे हाती लागले नाही. ते कुठे गेला याचा कुठलाच ठाव ठिकाणा लागत नसल्याने आरोपींनी त्यांचा मोर्चा तरुणाच्या कुटुंबाकडे वळवला. दरम्यान ५ ऑक्टोबरला विनायक हा काही कामानिमित्त चंद्रपूर येथून वणी येथे आला होता. यावेळी संबंधित तीन मारेकरी त्याच्या मागावरच होते.

त्या तिघांनी विनायकाला बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून बेलोरा फाटा परिसरात नेले. तेथे मुलगा व त्याने पळवून नेलेली महिला कुठे याचा जाब विचारला. विनायकने मुलासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी विनायकला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हेतर त्याच्या गळ्यावर लाथ देत त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर मारेकरी विनायकचा मृतदेह तेथेच टाकून पसार झाले. मात्र मृतदेह सापडल्यानंतर गोपनीय माहितीत या खूनाचे बिंग फुटले. त्यानंतर शिरपूर पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून या खूनाचा उलगडा केला. शिवाय तिन्ही मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई फौजदार रावसाहेब बुधवंत यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.