यवतमाळ : बेघर मनोरुग्ण पुनर्वसनाचे काम करणाऱ्या येथील नंददीप फाऊंडेशनला या कामासाठी अखेर स्वतःची हक्काची जमीन मिळाली. ‘लोकसत्ता’ ने सप्टेंबर २०२३ मध्ये नंददीपच्या कार्याची दखल घेऊन, ‘ सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमात मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत यवतमाळातील उद्योजक, समाजसेवी हरिओम भूत यांनी नंददीपला शहरालगत साडेतीन एकर जमीन विकत घेऊन त्याचे दानपत्र करून दिले. हा दानपत्र अर्पण सोहळा नंददीपला अर्जुना शिवारात मिळालेल्या जागेवर शनिवारी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता होते. प्रमुख अतिथी म्हणून कमलादेवी भूत, हरिओम भूत, मंजूदेवी भूत, सुरेश राठी, रमेश भूत, निरंजन व सरिता भूत, आशुतोष व शीतल भूत, बळवंत चिंतावार, अर्जुनाचे सरपंच अमोल जयस्वाल आणि नंददीपचे संदीप शिंदे, नंदिनी शिंदे उपस्थित होते. कुठल्याही शासकीय निधीशिवाय लोकसहभातून संदीप व नंदिनी शिंदे दाम्पत्याने या मनोरुग्ण सेवेचे कार्य लीलया पेलले आहे.
समाजात बरेच धनाढ्य आहे परंतु, दानासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे. या मानवीय कार्यासाठी पुढे आलेल्या भूत कुटुंबीयांची सामाजिक जाण या कार्यातून लक्षात येते,असे प्रतिपादन यावेळी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले. या प्रसंगी त्यांनी या जागेवर प्रस्तावित असलेल्या मनोरुग्ण निवारा केंद्राच्या बांधकामासाठी ५१ हजार रुपयांची वैयक्तिक मदत जाहीर केली.
यावेळी बोलताना हरिओम भूत यांनी, सामाजिक जबाबदारीचे भान आई वडिलांच्या संस्काराने आमच्यात रुजविले, असे सांगितले. त्यामुळेच वयोवृद्ध आई कमलादेवी यांच्या आशीर्वादाने त्यांच्या हस्ते मनोरुग्ण सेवाकार्यासाठी ही जमीन नंददीपला बक्षिसपत्र करून दिली. मनोरुग्ण सेवेचे हे कार्य मोठे झाले पाहिजे म्हणूनच भूत परिवाराने यासाठी पुढाकार घेतला आहे. असे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रा.घनशाम दरणे यांनी केले. संचलन पत्रकार नितीन पखाले यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भूमिप्रदान शिळेचे अनावरण तसेच वटवृक्षाची लागवड करण्यात आली.
स्वयंसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप
पुनर्वसन प्रक्रियेत देशोदेशी तसेच राज्याचा धांडोळा घेत मनोरुग्णांचे (प्रभुजी) त्यांच्या कुटुंबीयांकडे पुनर्वसन करणारे नंददीपचे स्वयंसेवक निशांत सायरे व त्यांची चमू, केंद्राचा लेखाजोखा तयार करणारे निवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र पवार, जमीन हस्तांतरण प्रक्रियेत मदत करणारे निवृत्त नगररचना अधिकारी छडानन राजुरकर, डॉ. प्रकाश नंदुरकर, डॉ.कविता करोडदेव, संकल्प फाउंडेशनचे प्रलय टिप्रमवार यांच्यासह वृद्धांचा सांभाळ करणारे शेषराव डोंगरे व खुशाल नागपुरे, सरपंच अमोल जयस्वाल यांना पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे हस्ते गौरविण्यात आले. ‘लोकसत्ता’ने दखल घेतल्याने बंद होणारे काम अविरत सुरू राहिले, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केली.