यवतमाळ : येथे गेल्या दोन दशकांपासून काम सुरू असलेले नाट्यगृह कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाट्यगृहाच्या बांधकामाचे भिजत घोंगडे कायम आहे. सहा महियांपूर्वी रखडलेले काम पुन्हा सुरु झाले तरीही विद्युत व्यवस्था, वातानुकुलीत व्यवस्था, साऊंड व इको सिस्टिम अशी महत्वाची कामे प्रलंबित आहेत.
नाट्यगृह उभारणीच्या कामाला २० वर्ष झाले. इमारत तयार असूनही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करावा लागत आहे. ज्येष्ठ कलावंत अशोक आष्टिकर, राजा भगत, विनायक निवल, प्रशांत गोडे आदी नाट्यकर्मी मंडळींनी पाठपुरावा करून सहा महिन्यांपूर्वी बंद पडलेले काम सुरु केले. परंतु, निधीअभावी सदर काम पुढे जाईल की नाही याविषयी साशंकता आहे.
२००४ साली मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते यवतमाळच्या नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर बांधकाम सुरू होऊन रखडले. या बांधकामाला पूर्णत्वास नेण्यासाठी २०२५ साल उजाडले. या काळात त्यावेळी केलेली अनेक काम दुसऱ्यांदा करावी लागली. तरी देखील महत्वाची कामे आजही प्रलंबित आहे. १४ जूनला पालकमंत्री संजय राठोड, आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार आदींनी नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. महत्वाच्या कामांसाठी टप्प्याटप्प्याने निधी मंजूर करू, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. नाट्यगृहात प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, रंगमंच ही व्यवस्था करण्यात आली. परंतु, महत्वाची विद्युत, वातानुकुलीत व्यवस्था, साऊंड सिस्टिम तसेच नाट्यगृहात आवाज घुमू नये यासाठी करावी लागणारी इकोसारखी महत्वाची कामे रेंगाळली आहेत. यावर इतका खर्च होत असताना या वास्तूची सुरक्षा व्यवस्था मात्र चोख नसल्याचे वास्तव आहे. नाट्यगृहाच्या अद्यावतीकरणासाठी सुद्धा बरीच कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे नाट्यगृह अमृतकाळात सुरू होण्याची शक्यता दिसत नाही.
सांस्कृतिक विकासाला खीळ
नाट्यगृहाभावी यवतमाळच्या सांस्कृतिक विकासाला खीळ बसली आहे. उत्तम नाटकं, मनोरंजनाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम येथे होत नाही. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ कलावंत प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहास भेट देऊन खंत व्यक्त केली होती. राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरील दुर्लक्ष कलावंत आणि रसिकांचा अंत पाहत असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नाट्य कलावंत विनोद बिंड यांनी दिली. या लढ्यात ज्यांचा सक्रिय सहभाग होता असे यवतमाळचे ज्येष्ठ रंगकर्मी कृष्णराव गोडे, गजानन बिंड, पद्माकर अंगाईतकर यांच्यासारखी मंडळी आज हयातीत नाही. खरेतर त्यांच्या पाठपुराव्याचा अंत जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाहिला, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रशांत गोडे यांनी दिली. यवतमाळमध्ये नाट्यगृह सुरू झाल्यास त्याचा फायदा व्यावसायिक दृष्टीने होईल. युवा पिढीला नाटक पाहण्याची व आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. सर्व सुविधांनी सुसज्ज अशा नाट्यगृहात कलाविष्कार प्रदर्शित करण्याची संधी मिळेल, असे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक आष्टीकर म्हणाले.