यवतमाळ : दिवाळी सण मोठा, आनंदास नाही तोटा! असे म्हटले जाते. पण, दिवाळीच्या निमित्ताने गावी किंवा पर्यटनास गेलेल्या नागरिकांचा आनंद हिरावून शहरात चोरटे ‘दिवाळी’ जोरात साजरी करत आहे. गेल्या आठवडाभरात शहरात घरफोडी आणि चोरींच्या घटनांत अचानक वाढ झाल्याने, शहर काँग्रेसने पोलीस प्रशासनास निवेदन देत, सण, उत्सवात नागरिकांना सुरक्षेची हमी द्या, अशी मागणी केली आहे.

दिवाळीच्या झगमगत्या रोषणाईत शहरातील बहुतेक कुटुंबं आपल्या गावी गेलेली आहेत. ही संधी साधून चोरटे सक्रिय झाले आहेत. यवतमाळ शहरात अशाच घरफोडी आणि चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. शहरात आर्णी रोड परिसरात दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी एकाच रात्री ओळीने चार ते पाच घरे फोडण्यात आली. असाच प्रकार शहरातील लोहारा, वाघापूर, वडगाव, मध्यवर्ती शहरात अनेक ठिकाणी उजेडात आला. दिवाळीनंतर बहुतांश लोक आपल्या गावी किंवा पर्यटनासाठी घर बंद करून बाहेर पडतात. दिवाळीच्या काळात अनेक वस्तू विक्रीच्या बहाण्याने चोरटे अशी कुटुंब हेरून, त्या घरांची रेकी करून ठेवतात. दिवाळीत ही कुटुंब घराबाहेर पडली की, घरात चोरी करून घर साफ करतात. याच पद्धतीने शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

या प्रकाराकडे पोलिसांनी वेळीच लक्ष घालून नागरिकांना चोरीमुक्त वातावरण देण्याची मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. काँग्रेसतर्फे शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजुदास जाधव व अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शहरात पोलिसांनी गस्त वाढविणे, रात्रीची नाकाबंदी मजबूत करणे आणि गृहरक्षक दलाची नेमणूक वाढविणे यासारख्या ठोस उपाययोजना तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख, तालुका अध्यक्ष रमेश भीसनकर, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद बगाडे, तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत काँग्रेसने, ‘सुरक्षित यवतमाळ जबाबदार प्रशासन’, हा संदेश दिला.

सण म्हणजे आनंद. पण हा आनंद भीतीशिवाय अनुभवता आला पाहिजे. प्रशासनाने जनतेच्या सुरक्षिततेकडे गंभीरतेने पाहावे, कारण घर लुटले गेले की, अनेकांचे सर्वस्व हिरावले जाते, असे प्रा. डॉ. अनिल देशमुख म्हणाले. शहरात प्रत्येक सणासोबत चोरी, घरफोडीच्या घटना समोर येतात. नागरिकांनीही खबरदारी घेत ‘माझं घर, माझी जबाबदारी’ हे ब्रीद नजरेसमोर ठेवून सावध रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.