यवतमाळ : हैदराबाद गॅझेटीअर व सेंट्रल प्रोविन्स अँड बेरार गॅजेट (नागपूर, म.प्र.) तसेच १९५६ च्या करारनाम्यानुसार आणि तत्सम आयोगाच्या शिफारशीनुसार बंजारा समाजाला तात्काळ न्यायाच्या तत्त्वावर शासन निर्णय काढून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू कराव्या, या मागणीसाठी आक्रोश करत हजारोंच्या संख्येने बंजारा समाज यवतमाळात एकवटला.
बंजारा समाजबांधव आज सोमवारी सकाळपासून यवतमाळात आर्णी रोड बायपासवर एकवटले. तेथून समाजाचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यवतमाळ मधील आर्णी रोडवरील संत सेवालाल महाराज चौक याठिकाणी समाज बांधवांचे एकत्रीकरण झाले. तेथून जिल्हा परिषद मार्गे बस स्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.
यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यामध्ये कृती समितीचे सदस्य डॉ. टी.सी राठोड, नवलकिशोर राठोड, भरत राठोड, डॉ. मोहन राठोड, एन.टी जाधव, श्रावण पवार, डॉ.बी एन चव्हाण, अॅड. अरुणा राठोड अॅड. सुधाकर जाधव, अॅड जगदीश पवार, अनिल आडे आदींचा समावेश होता.
या निवेदनामध्ये हैदराबाद गॅझेटियर संदर्भानुसार बंजारा समाजाला तत्काळ संविधानातील अनुच्छेद १४ व २१ प्रमाणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर शासन निर्णय काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू करण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली. मुळात बंजारा समाज हा आदिवासीच आहे. सरकारने लक्ष देऊन या समाजाला न्याय द्यावा अशी मागणी, या निवेदनातून महाराष्ट्र शासनाला करण्यात आली आहे.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानंतर यवतमाळ येथील पोस्टल मैदानात बंजारा समाज बांधवांची सभा आयोजित करण्यात आली. हजारोंच्या संख्येत जमलेल्या समाज बांधवांना आरक्षणाची पुढील दिशा आणि न्याय मागणीसाठी लढ्याचे स्वरूप कसे असणार याविषयी कृती समितीच्या नियोजनानुसार डॉ .टी सी राठोड प्रा. आयुषी राठोड प्रा. प्रवीण पवार, माजी खासदार हरिभाऊ राठोड आदींनी सभेला संबोधित केले.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान वाचनाने करण्यात आली संविधानाचे वाचन राजश्री आडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. टी.सी राठोड यांनी केले. आभार बंडू जाधव यांनी मानले. कृती समितीच्या नियोजनानुसार मंचावर एकही वक्ता किंवा पाहुणा बसणार नाही, याची काळजी घेण्यात आली. या सभेचे संचालन राजुदास जाधव यांनी केले. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.