लोकसत्‍ता टीम

अमरावती : इर्विन चौक-रेल्वे स्‍थानक मार्गावरील एका पडक्‍या इमारतीमध्ये मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे कोतवाली पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करीत आरोपीस अटक केली आहे.

अरुण सोळंके (३०) रा. राजुरा असे आरोपीचे नाव आहे. राजुरा येथीलच रहिवासी सवगेश नरलेश पवार (२३) याचा मृतदेह शनिवार, १३ जानेवारी रोजी सकाळी ८.४० वाजताच्या सुमारास इर्विन चौक ते रेल्वे स्‍थानक मार्गावरील गजानन महाराज मंदिराजवळील एका पडक्या इमारतीमध्ये कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. मृतदेहाजवळ आढळलेल्या मोबाईलमुळे त्याची ओळख पटल्यानंतर कोतवाली पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरण मिळविले. त्यात ९ जानेवारी रोजी रात्री ९.१५ ते ९.३० या कालावधीत आरोपी अरुण सोळंके हा सवगेश पवार याचा पाठलाग करताना व त्याच्या दिशेने विट फेकून मारताना दिसून आला. सवगेश हा खाली पडल्याचेदेखील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यावरून आरोपी अरुण सोळंके हा निष्पन्न झाला. सवगेशच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सवगेशचा मृत्यू हा डोक्याला गंभीर दुखापतीने झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. या प्रकरणी मृतकाचा भाऊ शुभम पवार याने कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.

आणखी वाचा-मालदीव वादावर परराष्ट्रमंत्र्यांनी मौन सोडलं; म्हणाले, “मी खात्री देऊ शकत नाही की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सवगेश पवार याचे एका विवाहितेशी अनैतिक संबंध होते. त्याला अरुण सोळंके हा वेळोवेळी विरोध दर्शवित होता. त्यामुळे दोघांत वादसुद्धा झाला होता. अरुण सोळंके याचा एक मुलगा इर्विन रुग्‍णालयात दाखल होता. ९ जानेवारी रोजी रात्री अरुण हा दोन मुलांना घेऊन गावाकडे जात होता. त्यावेळी त्याला रुग्‍णालयाबाहेर सवगेश दिसला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शवविच्छेदनगृहापासून अरुण हा सवगेशच्या मागे मारायला धावला. तो पळत असल्याचे पाहून अरुणने त्याला विट फेकून मारली. ती त्याच्या डोक्याला लागली. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्‍ये चित्रित झाला आहे.