बुलढाणा : मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रमनजीकच्या श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थान (दुधा ब्रम्हपुरी ) येथे महादेवाच्या दर्शनासाठी आलेला तरूण पैनगंगा नदीत वाहून गेल्याची घटना शुक्रवारी घडली. तब्बल २० तासांनंतर आज सकाळी त्याचा मृतदेह हाती लागला.

रवींद्र नामदेव नन्हई ( ४०, रा. साखर खेर्डा, ता. सिंदखेड राजा) असे मृताचे नाव आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थान रुग्णालयाच्या ऑपरेशन थेटर विभागात तो कामाला होता. कुटुंबीयांसह तो शुक्रवारी ओलांडेश्वराच्या दर्शनाकरिता आला होता. आंघोळीसाठी नदीपात्रात उतरल्यानंतर पाय घसरल्याने तो वाहून गेला. हे पाहून त्‍याची पत्‍नी, भाऊ, भावजय, लहान मुले यांनी हांबरडा फोडला. यावेळी काही लोकांनी नदीत उडी घेऊन शोधाशोध केली. परंतु तो आढळला नाही.

हे ही वाचा…“मी बैलासारखा काम करेन,” काँग्रेस खासदाराचे आश्वासन अन्…

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले. शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जिल्हा शोध बचाव पथक ओलांडेश्वर संस्थान येथे दाखल झाले. दुथडी भरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या प्रवाहात त्यांनी दीडेक तास शोध घेतल्यावर अखेर रवींद्रचा मृतदेह हाती लागला.

हे ही वाचा…शरद पवार गटाच्या संपर्कात आणखी एक नेता! जयंत पाटलांसोबत कारप्रवास अन्…

भाविकांनी दक्षता घ्यावी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैनगंगा नदीवरच बांधण्यात आलेल्या आणि ३ ऑगस्टपासून तुडुंब भरलेल्या पेनटाकळी धरणाची दोन दारे शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी १५ सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. यामुळे पैनगंगा नदीतील पाणी वाढले. सध्या ही नदी दुथडी भरून वाहात आहे. पेनटाकळी धरणात ९४ टक्के पाणीसाठा असल्यामुळे आणखी काही दारे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर येवू शकतो. यामुळे दुधा ओलांडेश्वरसह नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील जलसाठा लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाचे अधिकारी गावात दवंडी देत आहेत. त्यामुळे श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी खाली उतरण्याचा प्रयत्‍न करू नये. नदीकाठावरूनच दर्शन, पूजा करावी, असे आवाहन ओलांडेश्वर संस्थान दुधा, ब्रम्हपुरीच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानेदेखील भाविक, पर्यटक आणि नागरिकांना नदीत न उतरण्याचा इशारा दिला आहे.