चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा पक्षांतराला जोर येण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप, वैयक्तिक वाद आणि नेतृत्वावरील नाराजीमुळे राज्यातील अनेक नेत्यांनी अलीकडे पक्षांतर केले. विदर्भात नुकताच एक पक्षांतर आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विदर्भातील आणि विशेषत: गडचिरोली जिल्ह्यातील मातब्बर नेते, राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला. आता विदर्भातील आणकी एक नेता शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे कळते.

गुरुवारी नेमकं घडलं तरी काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बल्लारपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा झाला. या मेळाव्यात स्थानिक नेत्यांनी बल्लारपूर व चंद्रपूर या दोन जागांसाठी आग्रह धरला. आघाडीत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ पक्षाच्या वाट्याला आला नाही तर सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशाराही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला.

हे ही वाचा…यवतमाळ : बाबाजी दाते महिला बँकेच्या तत्कालीन सीईओंसह चौघांना अटक, २४२ कोटींची कर्ज थकबाकी…

जयंत पाटलांचे आश्वासन

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह पाहता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मतदारसंघात मेळावे व सभा घेतल्या जात आहेत, असे सांगून बल्लारपूर आपल्या पक्षासाठी महत्त्वाचा मतदारसंघ असल्याचे सुतोवाच केले. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

कोणत्या मतदारसंघावरून तिढा?

महाविकास आघाडीत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. बल्लारपूर आणि चंद्रपूर या दोन मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने पराभूत झाले आहेत. यामुळे शरद पवार गटाने या दोन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत या जागांवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा…गोंदियाः ‘हे’पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही,कॉग्रेसचे चेनीथल्ला म्हणतात,‘मुख्य न्यायाधीशांच्या घरी…’

विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक

काँग्रेसमध्येही या जागांवरून इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर असे दोन गट काँग्रेसमध्ये आहे. हे दोन्ही नेते आपापल्या समर्थकाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत. तथापि, दोन्ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता लक्षात घेता काही नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत हेही शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

हे ही वाचा…यवतमाळ : ट्रकची धडक , दुचाकी चाकाखाली…पण, चालकाने चक्क बोनेटला पकडून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘त्या’ कारप्रवासामुळे चर्चांना वेग

संतोष सिंह रावत बल्लारपूर मतदारसंघासाठी आग्रही असल्याचे कळते. त्यांच्यामागे वडेट्टीवार यांचे पाठबळ आहे. मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपामुळे रावत यांच्या उमेदवारीत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही, बल्लारपूर मतदारसंघातून कुठल्याही स्थितीत निवडणूक लढायचीच, असा निर्धार रावत यांनी केला आहे. यासाठी ते काँग्रेससोबतच शरद पवार गटाच्याही संपर्कात आहेत. रावत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. एवढेच नाही तर रावत आणि पाटील यांनी भद्रावती ते नागपूर विमानतळ, हा दोन तासांचा प्रवास एकाच गाडीतून केला. या कारप्रवासामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. या दोन तासांत पाटील व रावत यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे.