नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील युवा नेत्यांची फळी विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांत पक्षाला मजबूत करण्यासाठी ‘घेऊन येतो आहे साहेबांचा संदेश’ हा उपक्रम राबवणार आहे. त्यासाठी १३ सप्टेंबरला नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील स्वागत लाॅनमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते असलेले आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा, आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, सलील देशमुख उपस्थित राहतील. सोमवारी प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख म्हणाले, बैठकीत विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात आले आहे. विदर्भात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी हा दौरा असून त्याची सुरुवात बुलढाणा जिल्हातील सिंदेखेडराजा येथून होईल. हा दौरा गडचिरोलीपर्यंत राहील. दौऱ्याच्या नियोजनासाठी १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता सिव्हिल लाईन येथील स्वागत लॉनमध्ये बैठक आयोजित केली आहे. बैठकीसाठी विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष यांच्यासह सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील, असेही देशमुख म्हणाले.
हेही वाचा – नागपूर : वलनी कोळसा खाणीतून पुन्हा उत्खनन, काय आहे करार जाणून घ्या
हेही वाचा – धक्कादायक! ‘दोन्ही मुले माझी नाहीत’,असे म्हणत चिमुकल्याला द्यायचा सिगारेटचे चटके
पत्रपरिषदेला अमरावती शरहचे निरीक्षक वेदप्रकाश आर्य, नागपूर शहरचे निरीक्षक मुनाज शेख, चंद्रपूर ग्रामीणचे निरीक्षक दिलीप पनकुळे, चंद्रपूर शहरचे निरीक्षक शेखर सावरबांधे, वर्धेचे निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, भंडाऱ्याचे निरीक्षक दीनानाथ पडोळे, गोंदियाचे निरीक्षक बजरंगसिंह परिहार यांच्यासह अल्पसंख्याक सेलेचे अध्यक्ष जावेद हबीब, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, ग्रामीण अध्यक्ष राजू राऊत, अमर जैन, किशोर बेलसरे, नूतन रेवतकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत अजित पवार गटाचे नेते असलेल्या गोंदिया, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यांतही पक्ष मजबूत करण्यावर मंथन होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.