अकोला : कुतूहल लागून असलेला शून्य सावली दिवस विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये १५ ते २८ मे दरम्यान अनुभवता येणार आहे. सदैव साथ देणारी आपली सावली काही क्षणांसाठी साथ सोडणार आहे.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५०° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण आणि दक्षिणायन होताना ही स्थिती राहते.

हेही वाचा – मोकाट श्वानांचा त्रास; व्यवस्थापनासाठी नागपूर महापालिका

सूर्य दररोज ०.५०° सरकतो. सूर्य क्रांती पृथ्वीवरील स्थळाशी समान कोन करते, तेव्हा सूर्य माध्यान्हाचे वेळी नेमका डोक्यावर आल्याने आपली सावली काही क्षणासाठी नाहिशी होते. उन्हाळ्यातील त्या शून्य सावली दिवसाला अधिक महत्त्व आहे, असे खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी सांगितले.
१५ ते २८ मे या कालावधीत या अनोख्या घटनेचा प्रारंभ दक्षिणेकडून उत्तरेकडे संबंधित शहराच्या जवळच्या भागात दुपारी १२ ते १२.३० या वेळेत घेता येईल. ही वेळ पूर्वेस कमी व पश्चिमेस वाढलेली असेल, असे ते म्हणाले.

असे राहतील शून्य सावली दिवस

दि. १५ मे सिरोंचा, १७ अहेरी, आलापल्ली, १८ मूलचेरा, आष्टी, १९ पुसद, बल्लारशा, चार्मोशी, २० वाशीम, चंद्रपूर, मेहकर, वणी आणि दिग्रस, २१ चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, २२ बुलढाणा, यवतमाळ, आरमोरी, वरोरा, २३ अकोला, खामगाव, बाळापूर, मूर्तिजापूर, ब्रम्हपुरी, २४ वर्धा, शेगाव, उमरेड, दर्यापूर, २६ नागपूर, भंडारा, परतवाडा, कामठी, २७ गोंदिया, तूमसर, रामटेक, चिखलदरा आणि २८ मे रोजी वरुड, नरखेड परिसरात शून्य सावली दिवस अनुभवता येईल.

हेही वाचा – विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! वसतिगृहांमध्ये लवकरच ‘ऑनलाईन’ प्रवेशप्रक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ध्रुवताऱ्याचे दर्शन

पृथ्वीवरील अक्षवृत्तीय तथा रेखावृत्तीय काल्पनिक रेषांचा खेळ दिवसा बघून रात्रीच्या प्रारंभी उत्तर आकाशात वरच्या बाजूला दिसणाऱ्या सप्तर्षी तारका समूहाच्या आधारे ध्रुवतारा बघता येईल. या ताऱ्याच्या स्थितीवरून पृथ्वीवर आपण कोणत्या ठिकाणी आहोत हे समजते, अशी माहिती दोड यांनी दिली.