लोकसत्ता टीम

यवतमाळ: जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत चालू शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या ‘महादीप’ परीक्षेत जिल्ह्यातील ५६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. या विद्यार्थ्यांना शनिवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते गौरविण्यात येऊन त्यांना विमान प्रवासासह देशात विविध ठिकाणी आठवडाभर सहलीची भेट शिक्षण विभागाने दिली.

जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होऊन चालू घडामोडींच्या ज्ञानासह त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून २०२१ -२२ या शैक्षणिक सत्रापासून ‘महादीप’ परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना गणित, बुद्धीमत्ता चाचणी, सामान्यज्ञान व इंग्रजी विषयांचे प्रश्न विचारले जातात.

आणखी वाचा- गडचिरोली : शाळेतून घरी परतताना नववीतील विद्यार्थिनीवर वीज कोसळली

यावर्षी या परीक्षेत जिल्हा परिषदेतील दोन हजार शाळांमधील आठ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. तालुका स्तरावर परीक्षेची पहिली व दुसरी फेरी झाली. पहिल्या फेरीतून चार हजार विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले होते. त्यातून जिल्हास्तरावर झालेल्या अंतिम फेरीत केवळ ५४७ विद्यार्थी पाहोचले. अंतिम फेरीतून ५६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. यात जिल्ह्यातील १६ पैकी १२ पंचायत समितीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक १६ विद्यार्थी घाटंजी तालुक्यातून पात्र ठरले. तर यवतमाळ लगतच्या लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्वाधिक सात विद्यार्थी या परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले.

आणखी वाचा- यवतमाळ : काळी रांगोळी काढून, काळ्या गुढ्या उभारणार! आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना अन्नत्याग आंदोलनातून श्रद्धांजली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुणवत्ता यादीत आलेल्या या ५६ विद्यार्थ्यांना विमानाद्वारे दिल्ली, चंदीगड, शिमला आदी ठिकाणी २४ मार्चपर्यंत सहल घडविली जाणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. हे सर्व विद्यार्थी नागपूरहुन आपला हवाईप्रवास सुरू करणार आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांदा या परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकून हवाईप्रवासाची संधी मिळविली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि या उपक्रमाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.