करोना संसर्गामुळे प्रशासनाचे र्निबध

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ मार्चपासून मंगल कार्यालय, लॉन्स, सभागृह वा तत्सम ठिकाणी विवाहसोहळा तसेच गर्दी जमेल अशा कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे या तारखेनंतर विवाहाचा मुहूर्त निश्चित झालेल्यांची अडचण झाली आहे. मुहूर्तानुसार अनेकांनी मंगल कार्यालय, लॉन्सची आधीच नोंदणी केली आहे. पत्रिकाही वितरित करण्यात आल्या. भोजन, मंडप वा तत्सम व्यवस्थांसाठी आगावू रक्कमही दिली गेली. अकस्मात विवाहसोहळ्यावर बंदी आल्याने लग्नाची तयारी करणारे कुटुंबीय हबकले आहेत. याचा सर्वाधिक आर्थिक फटका वधुपित्याला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

शहर आणि जिल्ह्यत करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मर्यादित संख्येत करोनाचे नियम पाळून लग्नसोहळ्यांना परवानगी होती. परंतु अनेक लग्नांमध्ये मयादेपेक्षा अधिक गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. राजकीय मंडळींच्या कुटुंबातील लग्नात तर करोनाचे नियम सर्रास धाब्यावर बसविले गेले. संबंधितांवर कारवाई मात्र झाली नाही. लग्नसोहळ्यातील गर्दी करोना प्रसाराचे केंद्र ठरत असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाने उपरोक्त निर्णय घेतला आहे.

१५ मार्चपर्यंत पूर्व नियोजित असलेल्या कार्यक्रमांबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस ठाण्याच्या परवानगीने नियम पाळून आयोजक, मंगल कार्यालय, लॉन्स, सभागृहधारकांना सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत परवानगी राहील. १५ मार्चनंतर लॉन्स, मंगल कार्यालय, सभागृह अशा ठिकाणी लग्न समारंभ िंकं वा तत्सम कार्यक्रमांच्या आयोजनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे १५ मार्चनंतर लग्नाच्या तारखा निश्चित करून तयारी करणाऱ्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. करोनाच्या नियमावलीचे पालन करून निवडक लोकांच्या उपस्थितीत काही कुटुंबांनी लग्नाची संपूर्ण तयारी केली आहे. मंगल कार्यालय नोंदणी, मंडप, भोजन व्यवस्था, निमंत्रण पत्रिकांची छपाई यावर मोठी रक्कम खर्ची पडली. पत्रिकांचे वितरणही झाले. ऐन वेळी र्निबध घातल्यामुळे मंगल कार्यालय, लॉन्सधारक वा भोजन व्यावसायिकांकडून नोंदणीसाठी दिलेली रक्कम परत मिळेल की नाही, याची भ्रांत अनेक कुटुंबांना पडली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत लग्नसोहळ्यांवर बंदी राहणार आहे. यामुळे संबंधितांना कुटुंबातील विवाहसोहळे पुढे ढकलावे लागतील. नव्या तारखा निश्चित करता येणार नाहीत. जेव्हा कधी परवानगी मिळेल तेव्हा मंगल कार्यालयात नोंदणी मिळेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या कुटुंबात एप्रिल किं वा मे महिन्यात विवाह होणार आहे, त्यांना नेमके काय करावे हे सुचेनासे झाले आहे. लग्नासाठी आवश्यक खरेदीची प्रक्रिया पार पाडली जात असताना प्रतिबंध आले. लग्नाची तारीख येईपर्यंत र्निबध कायम राहतील का, पत्रिका वितरणाचे काय करायचे, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. यातील काहींनी मंगल कार्यालय नोंदणी करताना ऐन वेळी काही निर्णय झाल्यास रक्कम परत करण्याची वा नव्या तारखेला नोंदणी करण्याची अट घातली होती. त्यामुळे त्यांना रक्कम परत मिळण्यात अडचणी येणार नाहीत. परंतु ज्यांनी अशी काही चर्चा न करता सर्व व्यवस्थांसाठी आगावू पैसे मोजले, त्यांची रक्कम परत मिळविण्यात दमछाक होणार आहे.

या व्यतिरिक्त निश्चित झालेला विवाह अधिक काळ लांबल्यास दोन्ही कुटुंबे आधीच्या सहमतीवर कायम राहतील का, याविषयी काही जण शंका उपस्थित करत आहेत.