News Flash

चिखलयुक्त रस्ते आणि तुंबलेली गटारे

सटाणा शहरातील वृंदावन कॉलनी, सन्मित्र हौसिंग, श्रमिकनगर, टेलिफोन कॉलनी, शिवाजी कॉलनी या नागरी वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर दुरुस्तीअभावी मोठे  खड्डे पडले आहेत.

सटाणा शहरात चिखलयुक्त झालेले रस्ते. (छायाचित्र - नितीन बोरसे)

सटाण्यात आपत्ती व्यवस्थापन कागदावरच

नाशिक : सटाणा शहरातील चिखलयुक्त रस्ते, दुरुस्तीअभावी नागरी वसाहतीतील रस्त्यावर साचलेली पाण्याची डबकी, तुंबलेल्या गटारी यामुळे पावसाळ्यातील पालिका प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन कागदावरच दिसून येत आहे.

सटाणा शहरातील वृंदावन कॉलनी, सन्मित्र हौसिंग, श्रमिकनगर, टेलिफोन कॉलनी, शिवाजी कॉलनी या नागरी वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर दुरुस्तीअभावी मोठे  खड्डे पडले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने पावसाळ्यात हा परिसर चिखलयुक्त झाल्याचे अनुभवायला येत आहे. पावसाळ्यात साचत असलेल्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसरीकडे जीव धोक्यात घालून रहिवाशांना चिखलयुक्त रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागत आहे. गटारीची अवस्थाही वेगळी नाही. ताहाराबाद रस्ता, मित्रनगर, नामपूर रोड, साठ फुटी रस्ता या प्रमुख रस्त्यावरील गटारी वेळीच स्वच्छ केल्या जात नसल्यामुळे ठिकठिकाणी डबकी साचून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे ‘स्वच्छ, सुंदर सटाणा शहर ’ या घोषवाक्याला एकप्रकारे हरताळ फासला आहे. प्रशासनाने तुंबलेल्या गटारी मोकळ्या कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

धोकादायक इमारती

सटाणा शहरातील नऊ इमारती धोकादायक म्हणून सर्वेक्षित करण्यात आल्या असून संबधितांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. या इमारती रिक्त करण्यास सांगण्यात आले आहे. नगरपरिषदेमार्फत आपत्कालिन परिस्थितीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. २०२०-२१ या अर्थसंकल्पात आपत्कालिन व्यवस्थेसाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले. तर नगरपरिषदेची सर्व प्रशासकीय यंत्रणा, पोलीस आणि महसूल यांच्या समन्वयाने आपत्कालीन परिस्थितीत सज्ज असल्याचे मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी सांगितले.

उपाययोजना काय ?

नगरपरिषद क्षेत्रातील ताहाराबाद रोड, कचेरी रोड, यात्रा मैदान परिसरातील मोठय़ा गटारी स्वच्छ करण्यात आल्या आहेत . विद्युत प्रवाहास अडथळे आणणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडण्यात आल्या. पावसाळापूर्व जंतुनाशकांची फवारणी केली जात आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अग्निशमन सेवा सज्ज ठेवण्यात आली. आपत्कालिन व्यवस्थेत प्रथमोपचार गट स्थापन करण्यात आला. शोध पथक, निवारा गट स्थापन करण्यात आलेला आहे. वैद्यकीय सेवेंतर्गत आपत्कालिन कृतीगट स्थापन करण्यात आलेला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:10 am

Web Title: muddy roads and clogged gutters ssh 93
Next Stories
1 पुणे रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
2 शाहू महाराजांमुळे सामाजिक परिवर्तनाला गती!
3 बाजारपेठेत गर्दीच गर्दी
Just Now!
X