महाराष्ट्र पोलीस अकादमीत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पोलीस दलात काम करताना वाईट प्रवृत्तींसोबत अधिक काळ घालवावा लागतो. त्याचा परिणाम आपल्यावर होणे योग्य नाही. कोणताही वाद, घटनेची हाताळणी करताना निरपेक्ष भावनेने काम करून आपली व्यावसायिकता सिद्ध करावी, असे आवाहन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र ११५ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून आपण काम करतो हे स्मरणात राहायला हवे. आपल्या कामातून नागरिकांमध्ये तसा विश्वास निर्माण करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि पालन महत्त्वाचे आहे. प्रबोधिनीमध्ये शिकलेल्या मूल्यांचा अंकुश मनावर असल्यास चांगली प्रगती करता येईल. ही मूल्ये प्रशिक्षणापुरती मर्यादित न ठेवता कार्यक्षेत्रात उपयोगात आणावी. तत्परता आणि संयम यांच्या समन्वयातून जीवनात परिवर्तन घडवून आणता येईल. अधिकाऱ्यांनी पोलीस दलास अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना स्वाभिमान शिकविल्याने ते देशासाठी लढले. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी कोणतेही भय किंवा दबावाला बळी न पडता आपल्या कर्तव्याचे पालन करावे. गुन्हेगारांना जरब बसविताना आपल्यातील माणूसपण जपणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सूचित केले.

तत्पूर्वी, अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी अकादमीच्या वाटचालीचा आढावा घेतला. अकादमीत सायबर गुन्ह्य़ांची उकल करण्याचे शिक्षण देण्याकरिता खास प्रशिक्षण केंद्र स्थापण्याच्या सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाने मान्यता द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  कुणाल चव्हाण, राजेश जवरे यांच्या नेतृत्वाखाली ६०० अधिकाऱ्यांनी शानदार संचलन केले. कार्यक्रमास नियोजित वेळेच्या ४५ मिनिटे विलंब झाल्याने उपस्थित इतर मंत्री आणि अधिकाऱ्यांना भाषण करता आले नाही. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस गृहनिर्माण आणि पोलीस कल्याण महामंडळाचे महासंचालक बिपिन बिहारी, अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना  उपस्थित होते.

सप्तशृंगी संकुलाचे उद्घाटन

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या अकादमी परिसरातील खुले सभागृह आणि सप्तशृंगी संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत तीन कोटी ६० लाख रुपये आहे. प्रशिक्षणार्थीना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहाचा उपयोग होणार आहे. सप्तशृंगी संकुलात १६८ पोलीस निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत ४१ कोटी ८७ लाख रुपये आहे. पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना निवासासाठी संकुलाचा उपयोग होणार आहे.