राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन

भाजप सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची ऐतिहासिक फसवणूक असून त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही. मेट्रो व स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांना रस असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसच्या वतीने शनिवारी येथे सामाजिक जागृती अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस कमिटीत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. पत्रकार परिषदेत विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या घोळास भाजपला जबाबदार धरले. कित्येक महिने उलटूनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाही. कर्जखात्यात पैसे जमा झाले नाही. शेतमालास हमीभाव नाही. महागाई वाढत आहे. कर्जामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. या स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते. सरकारच्या कार्यशैलीमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बनावट कीटकनाशक फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांबरोबर मंत्र्यांनाही जबाबदार धरावे. उभयतांच्या संगनमताने राज्यात बनावट औषधांची विक्री झाली. सरकारच्या निष्काळजीपणामुळे उपरोक्त घटना घडल्या. यामुळे संबंधित विभागाच्या मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजप सरकारविषयी शेतकरी व नागरिकांमध्ये कमालीचा रोष आहे. दृष्टचक्रात जनता भरडली जात आहे. त्यांचा आक्रोश मांडण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यात विभागवार आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विखे यांनी सांगितले.