शहराच्या मध्यवर्ती भागातील वकीलवाडी परिसरात शनिवारी दुपारी निंबाचे झाड अचानक उन्मळून पडल्याने दोन वाहनचालक जखमी झाले, तर अनेक दुचाकी व चार चाकी वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. झाडाखाली अडकलेल्या एका वाहनधारकास दीड तासाच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. महात्मा गांधी रस्त्यालगतचा वकीलवाडी हा बाजारपेठेचा परिसर आहे. या ठिकाणी माणसांची मोठी वर्दळ असते.

शनिवारी दुपारी दोन वाजता रस्त्यालगतचे निंबाचे मोठे झाड मुळापासून उन्मळून पडले. या झाडाचा काही भाग अमेय नंदकिशोर वैद्य आणि उमेश गोडसे यांच्या वाहनावर पडला. त्यातील एकाची काही वेळात सुटका झाली, परंतु दुसऱ्याचा पाय वाहनासह ओंडक्याखाली अडकला. झाडामुळे आसपासच्या अनेक दुचाकी व चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह स्थानिक कार्यकर्ते मदतीला धावले. झाडांची रुंदी पाहता त्याला ठिकठिकाणी दोरी बांधून ते बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यानच्या काळात पडलेल्या झाडाचे लहान ओंडके करण्यात आले. इतके सारे करूनही वाहनचालकावरील ओंडका बाजूला करण्यात अडचणी येत होत्या. अखेरीस हवेच्या बॅगचा वापर करून अडकलेल्या वाहनधारकास बाहेर काढण्यात आले. दरम्यान, वकीलवाडीचा रस्ता निमुळता असल्याने अग्निशमन विभागाच्या वाहनांना गर्दीमुळे पोहोचण्यास अडचणी आल्या. पाहणाऱ्यांनी गर्दी केल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता काहींनी ‘सेल्फी’ काढण्याची तर काहींनी या घडामोडी भ्रमणध्वनीत कैद करण्यासाठी धडपड केल्याचे पाहावयास मिळाले.